बावधन : ग्रामपंचायतीमध्ये विवाह नोंद करण्यासाठी नवविवाहित दांपत्याने येथील पाची देऊळ डोंगर परिसरात किमान एक झाड लावणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे झाड लावल्यानंतर त्याचा जिओ टॅग फोटो ग्रामपंचायतीस सादर करावा. लावलेल्या झाडाची योग्य निगा राखणे, संगोपन करणेही बंधनकारक आहे. याबाबतच्या ठरावास ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली. सदस्य संदीप पिसाळ यांनी मांडलेल्या ठरावास सर्वांनी पाठिंबा दिला.
माझी वसुंधरा ६.० अभियानांतर्गत ग्रामपंचायतीने पर्यावरणपूरक निर्णय घेतला आहे. गावात स्वच्छता, वृक्षारोपण अशा विविध उपक्रमांसोबतच विवाहित दांपत्यास एक झाड लावणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे ‘एक विवाह, एक झाड’ हा संकल्प पूर्ण होणार आहे. यातून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्नही करण्यात येणार आहे.
याबाबतचा निर्णय घेणारी राज्यातील एकमेव ग्रामपंचायत असणार आहे. यातून वेगळा आदर्श ग्रामपंचायतीने ठेवला आला आहे. या उपक्रमाचा प्रारंभ योगेश वेदपाठक आणि पत्नी धनश्री वेदपाठक या दांपत्याने केला आहे. त्यांनी पाची देऊळ परिसरात वडाचे एक झाड लावून त्याचे योग्य ते संगोपन करण्याचे वचन दिले आहे.
या वेळी सदस्य संदीप पिसाळ, श्रीराम पोतदार, शशिकांत चव्हाण, रोहित सूर्यवंशी उपस्थित होते. वृक्षारोपण झाल्यानंतर वधू-वरास सरपंच वंदना कांबळे, ग्रामपंचायत अधिकारी आर. व्ही. चव्हाण यांच्या हस्ते डिजिटल बारकोड असलेले विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले.