सातारा : 26 जानेवारी 2026 रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त सातारा येथील छत्रपती शाहू क्रीडा संकुल येथे प्रजासत्ताक दिन सोहळ्यामध्ये करंजे पेठे येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव पाटील हायस्कूल व जुनिअर कॉलेज, न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल, आदर्श विद्या मंदिर, माणिक कासट बालक मंदिर या चारही शाखेतील सुमारे 700 विद्यार्थ्यांनी 'महाराष्ट्राची लोकधारा' या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन घडवले.
शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव तुषार पाटील यांची संकल्पना व त्यांच्याच मार्गदर्शनाखाली या भव्य दिव्य कार्यक्रमाचे नियोजन केले गेले. या नेत्रदीपक कार्यक्रमाने सातारकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले प्रथम मातृभूमीला वंदन करून महाराष्ट्रीयन संस्कृतीत श्रीकृष्णाचे रूप मानणाऱ्या वासुदेवांचे दर्शन नृत्यातून घडवण्यात आले.
महाराष्ट्रीयन शेतकरी,महाराष्ट्रातील पांडुरंगाचा पालखी सोहळा, गणेशोत्सव, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर देशभक्ती या विषयांवर आधारित महाराष्ट्राची लोकधारा हा एक भव्य दिव्य सोहळाच शाहू स्टेडियमवर सादर केला. प्रत्येक नृत्याला अनुसरून महाराष्ट्रातील खेळाडूंचे दर्शन तर कधी दान पावलं ऽऽऽऽ म्हणत येणाऱ्या वासुदेवाचे दर्शन घडवले. पालखी सोहळ्याच्या वेळी घोड्याचे उभे रिंगण, संत ज्ञानेश्वरांच्या पादुकांचा रथ , दिंड्या पताका व टाळ मृदंगाच्या तालावर नाचणारे बाल वारकरी पाहून उपस्थितांचे भान हरपले. कार्यक्रमामध्ये लेझीम व ढोल पथकाच्या तालावर निघालेल्या गणपतीच्या मिरवणुकीने उपस्थित तरुणांना ताल धरायला भाग पाडले. शेतकरी नृत्या वेळी प्रत्यक्ष बैलगाडी, बैल जोडी, नांगरधारी शेतकरी तर धनगरीनृत्यावेळी मेंढ्यांचा कळप व ढोलाच्या तालावर नाचणारे धनगरी वेशातील विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाचे आकर्षण ठरलेले भाले, तलवारी, अबदागीर्या, छत्र व मावळ्यांच्या लवाजम्यासह छत्रपती शिवरायांचे घोड्यावरून झालेले आगमन पाहून उपस्थित सन्माननीय पालकमंत्री ना. शंभूराज देसाई , जिल्हाधिकारी मा. संतोष पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख मा. तुषार दोशी व इतर मान्यवर अधिकारी यांनीही बालकलाकारांचे कौतुक केले. देशभक्तीपर गीताच्या वेळी भारत माता , आझाद हिंद सेना, नेताजी सुभाषचंद्र बोस, कॅप्टन लक्ष्मी, महात्मा गांधीजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, स्वामी विवेकानंद, तसेच महाराष्ट्रात होऊन गेलेले संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत गाडगे महाराज यांचेही हुबेहूब दर्शन सातारकरांना घडवून देश प्रेम वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला.
हा नयनरम्य सोहळा उत्तमरीत्या सादर करण्यासाठी शिक्षण प्रसारक संस्थेच्या अध्यक्षा सौ वत्सला डुबल, उपाध्यक्ष जगन्नाथ किर्दत, नंदकिशोर जगताप, सचिव तुषार पाटील, चेअर पर्सन सौ प्रतिभा चव्हाण, संस्थेतील सर्वच संचालक, तसेच श्रीपतराव पाटील हायस्कूल व जुनिअर कॉलेज, न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल, आदर्श विद्यामंदिर, माणिक कासट बालक मंदिर, या शाखांतील सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांनी कष्ट घेतले.