सातारा : सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक पुढील काही महिन्यात होत असून गट आणि गणांचा प्रारूप आराखडा सोमवार, दि. १४ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यामुळे कोणते गट आणि गण होणार याची उत्सुकता लागली आहे. तर या गट आणि गण तसेच गावांतील समावेशाबद्दल २१ जुलैपर्यंत हरकती नोंदवता येणार असल्याचे उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी सांगितले.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. २०१७ मधील प्रभाग रचना विचारात घेऊन कार्यवाही होत आहे. यावेळी सातारा जिल्ह्यात एक गट आणि दोन गण वाढलेत. एकूण ६५ गट आणि १३० गणांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये ओबीसी प्रवर्गासाठीही आरक्षण असणार आहे. याबाबतचा गट आणि गणांचा प्रारूप आराखडा १४ जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे. प्रत्येक तालुकास्तरावर याबाबत कार्यवाही केली जाणार आहे. यातून कोणते गंट आणि गण राहणार याची माहिती समोर येणार आहे. तसेच या कच्च्या आराखड्यात समाविष्ट गावांचीही नावे असणार आहेत. प्रारूप आराखड्यात सातारा तालुक्यात ८ गट आणि १६ गण. असणार आहेत. तर वाई तालुक्यात ४ गट व ८ गण, महाबळेश्वरला जिल्हा परिषदेचे २ गट, ४ गण, खंडाळा ३ गट, ६ गण. फलटण ८ गट, १६ गण, माणमध्ये ५ गट, १० गण. खटावला ७गट १४ पंचायत समितीचे गण, कोरेगावला ६ गट, १२ गण, पाटणला ७ गट व १४ गण, जावळी ३ गट अन् ६ गण तर कराड तालुक्यात १२ गट आणि २४ गण असणार आहेत. या गट आणि गणांची नावे जाहीर होणार आहेत. त्यानंतर प्राप्त हरकतींवर आयुक्तांसमोर सुनावणी होणार आहे.