पाटण : प्रत्येकाला आपला पक्ष मोठा करण्याचा अधिकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्यासोबत असल्याने तुम्ही अजिबात चिंता करू नका. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक ताकदीने लढा. त्यासाठी भाजप आपल्याला निश्चितच ताकद देईल, असा विश्वास ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी दिला.
कोयनानगर येथे आयोजित केलेल्या रानभाजी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर अध्यक्षस्थानी होते. भाजप नेते व जिल्हा बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर, याज्ञसेन पाटणकर, सागर शिवदास, हिंदूराव पाटील, राजाभाऊ शेलार, विक्रमबाबा पाटणकर, पाटणच्या नगराध्यक्षा अनिता देवकांत, उपनगराध्यक्ष सचिन कुंभार उपस्थित होते. प्रारंभी मंत्री गोरेंच्या हस्ते रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन झाले.
मंत्री गोरे म्हणाले, ‘‘ या भागाला विकासाची दिशा देणारेही विक्रमसिंह पाटणकर आहेत. दुर्गम भागातील जनतेसाठी हे एक चांगले नेतृत्व आहेत. भाजपच्या कार्यकर्त्याला ताकद देणे, हे माझे कर्तव्य आहे. माझा लढा पाण्यासाठीच होता. आमचा दुष्काळी भाग; पण तुमच्या आशीर्वादाने आज आमच्या तालुक्यात ऊस घेतला जातो. तुम्ही योग्य ठिकाणी आला असून, आता योग्य सन्मान होईल. येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीत ताकदीने लढूया.’’
विक्रमसिंह पाटणकर म्हणाले, ‘‘रानभाज्या आणि आपल्या स्थानिक गोष्टींसाठी आपण बाजारपेठ उपलब्ध करू. आपल्या स्थानिक गोष्टींना आपण जगासमोर आणले पाहिजे. आपल्या शरीरात चांगले अन्न गेले, तर आपले आरोग्य चांगले राहील. भविष्यात विषमुक्त शेतीकडे लक्ष देऊन मार्टेकिंगचा प्रश्न सोडवायचा आहे. भाजपची ताकद आपल्यासोबत आहे. निर्भीडपणे कार्यकर्त्यांनी काम करा. पक्ष आपल्या पाठीशी उभा आहे.’’
यावेळी सत्यजितसिंह पाटणकर, विक्रमबाबा पाटणकर, राजाभाऊ शेलार, भाजपचे तालुकाध्यक्ष नंदकुमार सुर्वे यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, यावेळी राजाभाऊ शेलार यांचा मंत्री गोरेंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्यजित शेलार यांनी प्रास्ताविक केले. मनोहर यादव यांनी सूत्रसंचालन केले. बाळा कदम यांनी आभार मानले.