सातारा, दि. १५ : आईचा खून केलेल्या प्रकरणी मोराळे, ता. खटाव येथील किरण शहाजी शिंदे ((वय ३५ ) या आरोपीस जन्मठेप व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.
यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी-दि. ११ डिसेंबर २०१९ रोजी आरोपी याने आपली आई मृत कांताबाई शहाजी शिंदे हिस माझे मागच्या मुलांची लग्ने झाली, तुम्ही माझे लग्न का करीत नाही असे म्हणून यातील फिर्यादी वडील शहाजी बाबुराव शिंदे (वय ६५) यांना घरातून लाथ मारून बाहेर काढले. घरास आतून कडी लावून मृत कांताबाई शिंदे यांना शिवीगाळ दमदाटी करून कुऱ्हाडीने डोकीत घाव घालून गंभीर जखमी करून खून केला.
तसेच यातील फिर्यादी व साक्षीदार यास तुम्ही घराचा दरवाजा तोडून आत आल्यास तुमचाही खून करीन अशी जीवे मारण्याची धमकी दिली असा गुन्हा त्यांचे वर दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यात तत्कालीन मायणी पोलीस दूर क्षेत्राचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक शहाजी चंद्रकांत गोसावी यांनी साक्षीदारांचे जाब जबाब नोंदवले व कसून तपास करून आरोपीविरुद्ध मा. अतिरिक्त जिल्हा सत्र व सत्र न्यायालय वडूज येथे दोषारोप पत्र दाखल केले होते.
या कामी सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील अजित प्रताप कदम (साबळे) यांनी काम पाहिले. यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने दहा साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांचे जाब-जबाब, कागदोपत्री पुरावा, वैद्यकीय पुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून माननीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एस.कोल्हे यांनी आरोपीला भा.द.वी.स. कलम ३०२ अन्वये दोषी ठरवून दि.१५.९ २०२५ रोजी आरोपी किरण शहाजी शिंदे भा.द.वि. स. कलम 302 अन्वये जन्मठेप व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधी कैदअशी शिक्षा सुनावली आहे.