सातारा : साताऱ्यात तब्बल ३२ वर्षानंतर ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनाच्या नियोजनाची जोरदार तयारी सुरु आहे. मसाप शाहूपुरी शाखा आणि मावळा फौंडेशनच्यावतीने विविध नियोजन बैठका आणि भेटीगाठी सुरु आहेत. ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी आणि शिष्टमंडळाने मदत व पुर्नवसन मंत्री मकरंद पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांना संमेलनाबाबत सर्व माहिती देण्यात आली. याप्रसंगी साताऱ्यात होत असलेल्या या संमलेनात सर्वतोपरी सहकार्य करु, अशी ग्वाही मंत्री मकरंद पाटील यांनी दिली.
साताऱ्यात होत असलेल्या ९९ व्या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी मंत्री श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची निवड झाली असून त्यांच्या नेतृत्वाखाली संमेलनाच्या तयारीला वेग आला आहे. समाजातील विविध घटकांच्या नियोजन बैठका सुरु आहेत. संमेलन नेटके आणि वैशिष्टयपूर्ण व्हावे यासाठी संयोजक संस्थांचे प्रयत्न सुरु आहेत. या संमेलनास जिल्हयातील विविध घटकांनी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. त्याचप्रमाणे विविध राजकीय पक्षांचे नेते, मंत्री यांची भेट घेऊन त्यांना संमेलनाबाबत माहिती देण्यात येत आहे. ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी मदत व पुर्नवसन मंत्री मकरंद पाटील यांची भेट घेऊन त्यांना साताऱ्यात होत असलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत माहिती दिली.
या संमेलनाच्या सुरु असलेल्या तयारीबाबतही त्यांना माहिती देण्यात आली. यावेळी मंत्री मकरंद पाटील यांनी साताऱ्यात होत असलेल्या या संमेलनात सक्रीय सहभाग घेऊन सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही दिले. साताऱ्यात तब्बल ३२ वर्षानंतर हे संमेलन होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त करत स्व.अभयसिंहराजे भोसले यांनी यशस्वी करुन दाखवलेल्या संमेलनाप्रमाणे हेही संमेलन वैशिष्टयपूर्ण आणि नेटके होण्यासाठी सहभाग देऊ असे आश्वासनही दिले. यावेळी ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत, मसाप, शाहूपुरी शाखेचे कोषाध्यक्ष सचिन सावंत, वजीर नदाफ, मसाप शाहूपुरी शाखा, मावळा फौंडेशनचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष खा. नितीन पाटील यांचाही पाठिंबा
याप्रसंगी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन खा. नितीन पाटील यांचीही भेट घेण्यात आली. त्यांना यावेळी ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजनाबाबत माहिती देण्यात आली. यावेळी त्यांनीही या संमेलनास सर्वतोपरी सक्रीय सहभाग देणार असल्याची ग्वाही दिली.