शिक्षक मतदारसंघ निवडणूक शिक्षक परिषद ताकदीने लढवणार; महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभागाची साताऱ्यात आढावा बैठक

by Team Satara Today | published on : 13 October 2025


सातारा  : सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे,  सोलापूर या विभागातील पाचही जिल्ह्यातून प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते सभासद बहुसंख्येने सहभागी झाले होते. बैठकीत एकमताने निर्धार करण्यात आला, की ‘पुणे विभाग शिक्षक मतदार संघ हा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा बालेकिल्ला असल्याने परिषद ही निवडणूक ताकदीने लढवणार.’ बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्य अध्यक्ष श्री वेणुनाथ कडू होते.

त्यांच्यासोबत कार्याध्यक्ष माजी आमदार भगवानराव साळुंखे, राज्य खजिनदार राजेंद्र सूर्यवंशी, पुणे विभाग अध्यक्ष सुरेश राठोड, राज्य सदस्य मुजावर, अमित कुलकर्णी, सोमनाथ राठोड, बजरंग शिंदे मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना श्री. कडू म्हणाले की, ‘महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ही शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी लढणारी  संघटना असून सर्वसामान्य शिक्षकांच्या प्रश्नांवर गेली साठ वर्षे आवाज उठवत आहे. पुणे विभागामध्ये संघटनात्मक रचना अत्यंत प्रभावी असून मतदार नोंदणी जोरदार पद्धतीने सुरू आहे. शिक्षक मतदार संघातून विधान परिषदेत निवडून जाणारा प्रतिनिधी हा शिक्षक परिषदेचा असणार’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुणे विभागात शिक्षक परिषदेची ताकद निर्णायक आहे. राष्ट्रीय विचाराची व शिक्षक हिताशी कटीबद्ध असलेल्या शिक्षक कार्यकर्त्याला संधी देऊन शिक्षक परिषद हा मतदार संघ जिंकून आपल्याकडे राखण्यात यशस्वी होईल ही खात्री व्यक्त केली.’

विभागाचे अध्यक्ष सुरेश राठोड यांनी तालुका निहाय झालेल्या नोंदणीचा आढावा घेतला व संघटनात्मक रचने बाबतही मार्गदर्शन केले. सर्व कार्यकर्त्यांना शिक्षक मतदार नोंदणी बाबत प्रोत्साहित करून त्याबाबत विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन देखील केले. श्री राठोड व मान्यवर यांनी शिक्षकांना याबाबत असलेल्या विविध शंका व प्रश्न यावर समाधानकारक उत्तर देऊन राज्य कार्यकारिणीचे कामकाज पार पाडले.

 माजी आमदार भगवानराव साळुंखे यांनी शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत विधानपरिषद सभागृहात घेतलेल्या भूमिकेविषयी आढावा मांडला व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शिक्षकांच्या प्रश्नांसाठी लढणारी राष्ट्रीय विचाराची संस्था असल्याबाबतचे नमूद केले. भविष्यात देखील शिक्षक परिषद व शिक्षक परिषदेचा प्रतिनिधी शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटीबद्ध असेल याची ग्वाही दिली.

 बैठकीच्या अनुषंगाने संघटनात्मक जिल्ह्याच्या सर्व जिल्हाध्यक्षांनी संघटनात्मक व मतदार नोंदणीबाबत निवेदने केली व एकमतांनी निवडणूक लढण्याविषयी एल्गार केला. 

बैठकीस विनायक कुलकर्णी, बाबुराव लोटेकर, श्री साळुंखे, कांबळे, राजेंद्र नागरगोजे, निलेश काशीद, विजय माने, विष्णू पाटील, श्रीमती सुजाता पाटील,  संदीप माळी, अमोल कदम, राजेश सातपुते, संदीप जाधव, ज्योती सुपेकर, शिल्पा पाटील, अश्विनी तांबोळे, राहुल रावण मान्यवर उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कराड उत्तरमधील पाणंद रस्त्यांसाठी सव्वा सात कोटींचा निधी मंजूर; आ. मनोज घोरपडे यांची माहिती; ३० गावातील ४२ पाणंद रस्ते मंजूर
पुढील बातमी
सासपडे प्रकरणातील आरोपीला तात्काळ फासावर लटकवा; मराठा क्रांती मोर्चा व ग्रामस्थांचा साताऱ्यात मोर्चा

संबंधित बातम्या