कराड दक्षिण, माण, वाई मतदारसंघ काँग्रेसला हवा

काँग्रेसच्या निरीक्षकांनी घेतला आठ विधानसभेचा आढावा

by Team Satara Today | published on : 24 October 2024


सातारा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या निरीक्षकांनी सातारा जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. यावेळी महाविकास आघाडीतून कराड दक्षिण, माण आणि वाई मतदारसंघ काँग्रेसला मिळावा, अशी मागणी पुन्हा करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अनेक बैठका आतापर्यंत झाल्या आहेत. त्यामध्येही माण, कऱ्हाड दक्षिण आणि वाई मतदारसंघ कॉंग्रेसला सोडण्याची मागणी करण्यात आली होती. यासाठी इच्छुकांच्याही मुलाखती पार पडल्या होत्या. त्यानंतर गुरुवारी पुण्यात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक टी. एस. सिंघदेव आणि एम. बी. पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला सातारा जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, सरचिटणीस नरेश देसाई, राजेंद्र शेलार आदी उपस्थित होते.

पुण्यातील बैठकीत पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभेच्या ९ मतदारसंघातील विधानसभा जागांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये सातारा जिल्ह्यातील विधानसभेच्या आठ मतदारसंघांचा आढावा झाला. पक्षाची ताकद, विधानसभा निवडणूक लढविण्यात येणाऱ्या मतदारसंघातील स्थिती याची माहिती देण्यात आली. यावेळी सातारा जिल्ह्यातील तीन मतदारसंघ काँग्रेसला मिळावेत, अशी मागणी पुन्हा करण्यात आली, असे सांगण्यात येत आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कराड दक्षिणमधून अतुलबाबांचा विजय निश्चित : खा. उदयनराजे भोसले
पुढील बातमी
निवडणुकीच्या धामधुमीत लोकप्रतिनिधींची बळीराजाकडे पाठ

संबंधित बातम्या