सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवड प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पार्टीने लोकशाही पद्धतीनेच पार पाडली. भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते या निवड प्रक्रियेपासून चार हात लांब होते. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम इथे अजिबात झालेले नाही. आमच्यावर आरोप करणारे विरोधक त्यांचे अपयश झाकण्यासाठी आमच्यावर आरोप करत असून ते धादांत खोटे आहेत, असे स्पष्टीकरण राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले. विरोधक जर जिंकले तर ती लोकशाही आणि भारतीय जनता पक्ष जिंकला तर ती दांडगाई हा कुठला न्याय आहे ? असा रोखठोक सवाल शिवेंद्रसिंहराजे यांनी उपस्थित केला.
येथील शासकीय विश्रामगृहात शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन भारतीय जनता पक्षाची जिल्हा परिषदेच्या निवड प्रक्रियेच्या वेळी नक्की काय घडले यावर विस्ताराने प्रकाश टाकला. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, कराड दक्षिणचे आमदार व भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल भोसले, कराड उत्तरचे आमदार मनोज दादा घोरपडे, भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे विक्रम पावसकर जिल्हा कार्यकारिणीचे उपाध्यक्ष पाणीपुरवठा सभापती धनंजय जांभळे, जिल्हा सरचिटणीस विकास गोसावी विठ्ठल बलशेठवार इत्यादी यावेळी उपस्थित होते.
शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, भारतीय जनता पक्षाने लोकशाही पद्धतीने ही निवड प्रक्रिया पार पाडलेली आहे. प्रत्यक्ष निवड प्रक्रिया होत असताना भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही कॅबिनेट मंत्र्यांचे वाहन जिल्हा परिषदेच्या आवारात पोहोचले नाही. निवड प्रक्रिया झाल्यानंतर मी व ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे हे नूतन अध्यक्ष उपाध्यक्षांचे अभिनंदन करण्यासाठी गेलो होतो.आम्ही आमचे 32 सदस्य घेऊन सभागृहात मतदान प्रक्रियेसाठी पाठवले होते.आमच्या विचाराचे काही सदस्य शिवसेना व राष्ट्रवादी पक्षांनी दबावाखाली ठेवले होते. सभागृहात गेल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी मतदान केले. ज्या सदस्यांनी आम्हाला मतदान केले ते जर त्यांच्याशी एकनिष्ठ होते तर मतदान आम्हाला का केले याचा अर्थ दबाव त्या सदस्यांवर होता. पालकमंत्री शंभूराज देसाई हे त्यांचे राजकीय अपयश लपवण्यासाठी आमच्यावर खोटे आरोप करत आहेत.
लोकशाही निवड प्रक्रियेत हस्तक्षेप करायचा नाही म्हणून आमच्यापैकी कोणीच तेथे नव्हते मात्र पालकमंत्री शंभूराजे आणि मदत व पुनर्वसन मंत्री राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष यांच्याच गाड्या जिल्हा परिषदेच्या आवारात होत्या. विरोधकांकडून राजकीय त्रागा होऊन त्यांनी आमच्यावर आरोप केले आहेत. भारतीय जनता पार्टीने लोकशाहीचे संकेत पाडून निवड प्रक्रिया पार पाडली आहे. त्यामुळे यशवंत विचारांना हरताळ फासला वगैरे असे काहीही घडलेले नाही. काही सदस्यांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांची पोलिसांनी चौकशी केली तर त्यामध्ये काहीही गैर नाही. कदाचित त्यांनी निवड प्रक्रियेत हस्तक्षेप केला नसता तर ते मतदान करू शकले असते. यावरून दबाव कोणाचा कोणावर होत आहे स्पष्ट होते.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, सातारा जिल्ह्यातील पोलिसांना पालकमंत्र्यांनी कशा पद्धतीने वागवले. त्या खात्याचे ते अडीच वर्ष गृहमंत्री होते. त्यांचा प्रोटोकॉल त्याचबरोबर देवदर्शनासाठी सातारा शहर वेठीला धरणे असे प्रकार ते करतात. जिल्हा परिषद निवड प्रक्रियेच्या दरम्यान सुद्धा पालकमंत्र्यांनीच पोलिसांशी मुद्दाम शिवराळ भाषा वापरली. संपूर्ण निवड प्रक्रियेमध्ये त्यांचाच गोंधळ सारा जिल्ह्याने पाहिला. त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना यांचे आधीच ठरले होते. त्यांनी निवडणुकीपूर्वी महायुतीच्या बैठकीसाठी आम्हाला त्यांच्या पीएकडून आमच्या पीएना निरोप पाठवला. दोन कॅबिनेट मंत्र्यांना अशा पद्धतीने निरोप पाठवणे हे योग्य नाही. त्यांची इच्छा होती तर त्यांनी थेट आम्हाला फोन केले असते. प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गट उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना अशा अनेक गटांना एकत्र केले होते. त्यामुळे त्यांची आघाडी महायुती धर्माला पाळणारी नव्हती. त्यांचे आधी ठरले होते त्यामुळे भाजपला स्वबळावर लढणे क्रमप्राप्त होते आणि आम्ही त्याच पद्धतीने लढत दिली.
मी ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे आम्हाला राजकीय दांडगाई करायची होती तर ती केव्हाही करू शकलो असतो. ते मला माण पंचायत समितीच्या निवडणुकीतही करणे शक्य होते. पण निवडणूक ही जिल्हा परिषद सदस्यांची होती. त्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करणे योग्य नव्हते. आम्ही लोकशाही पद्धतीने या निवडणूक प्रक्रियेपासून अलिप्त राहिलो. विरोधकांच्या वतीने ज्या तक्रारी होत आहेत. त्या राजकीय वैफल्यातून आहेत.पालकमंत्री पदाच्या संदर्भाने मी जे बोललो ते पाटणचे पालकमंत्री आमचे सत्यजित पाटणकर आहेत. यासंदर्भाने बोललो त्यांच्या पालकमंत्री पदाची जेष्ठत्वतः आम्ही स्वीकारले आहे त्यावर आमचा कोणताही आक्षेप नाही. मात्र पाटण तालुक्याचे भाजपचे पालकमंत्री सत्यजित पाटणकर आहेत. या संदर्भाने मी त्यावेळी बोललो होतो. भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा परिषदेत स्वबळावर राज्यकारभार करू शकते हा माझा ठाम विश्वास आहे, असे जयकुमार गोरे म्हणाले .