साताऱ्यामध्ये सोने लुटणारा भामटा अखेर जाळ्यात; गुन्हे प्रकटीकरण शाखेची पाथर्डी तालुक्यात कारवाई, साडेचार लाखाचा सोन्याचा मुद्देमाल जप्त

by Team Satara Today | published on : 23 December 2025


सातारा : साताऱ्यामध्ये वृद्ध महिलांचे सोने लुबाडणाऱ्या अट्टल भामट्याला सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अहमदनगर जिल्ह्यातील भालगाव येथे शिवारामध्ये थरारक पाठलाग करून जेरबंद केले. गणेश विनायक गायकवाड (वय 36 रा.  भालगाव ता.  पाथर्डी,  जि.  अहिल्यानगर) असे संबंधित संशयिताचे नाव आहे.

पोलीस चौकशीमध्ये त्याने तीन गुन्ह्यांची कबुली दिली असून साडेचार लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे .सातारा शहर परिसरात वृद्ध महिलांना सोन्याचे बिस्किट देऊन त्यांच्याकडील सोने फसवणूक करून लुटण्याचे प्रकार सुरू होते .पोलीस अधीक्षक तुषार दोशीयांच्या आदेशाप्रमाणे सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला तपासाच्या सूचना दिल्या त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे सुजित भोसले निलेश जाधव सतीश मोरे सुनील मोहिते निलेश यादव या पथकाने कसून शोध सुरू केला डीपी पथकातील कर्मचाऱ्यांनी 25 च्या वर अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र संशयित इसमांचे वर्णने नीटशी मिळू शकत नव्हती. पुणे प्रकटीकरण शाखेने चार महिने सलग कसून प्रयत्न करत संशयित इसमांची माहिती प्राप्त केली. त्यातील एक आरोपी हा त्याच्या गावांमध्ये नातेवाईकांना चोरून भेट त असल्याची माहिती प्राप्त झाली.

भालगाव,  ता.  पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर येथील रानामध्ये आरोपी येणार असल्याची माहिती मिळाल्याने गुन्हे प्रकटीकरण शाखेने तेथे फिल्डिंग लावली. संशयित गणेश गायकवाड हा अंधाराचा फायदा घेऊन घरी येत असताना सातारा पोलिसांनी त्याला हटकले. तेथून शेतातून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी घेरत त्याचा पाठलाग करून पकडले आणि साताऱ्यातील गुन्ह्यांबाबत कसून चौकशी केली. सोन्याचे दागिने लुबाडल्याचे त्याने कबूल केले. गायकवाड याच्याकडून साडेचार लाख रुपये किमतीचे सोने हस्तगत करण्यात आले आहे. गणेश गायकवाड याच्या अन्य एका साथीदारांचा शोध घेतला जात आहे.

या कारवाईत पोलीस कॉन्स्टेबल तुषार भोसले, पंकज मोहिते, प्रवीण कडव ,सागर गायकवाड, संतोष घाडगे, मच्छिंद्रनाथ माने, आशुतोष डोळस , वैभव माने,सुशांत कदम, सुहास कदम यांनी सहभाग घेतला होता.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मागसवर्गीयांच्या शौचालयप्रश्नी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करु; झेडपी सीईओंच्या आश्वासनानंतर रमेश उबाळे यांचे आंदोलन स्थगित
पुढील बातमी
९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त आयोजित विविध स्पर्धांचे निकाल जाहीर

संबंधित बातम्या