सोने विक्रीचा बनाव करून मारहाण करत बेळगावच्या सराफाचे 35 लाख रुपये कराडमध्ये लुटले; तिघांवर गुन्हा दाखल करून, दोघांना अटक

by Team Satara Today | published on : 26 October 2025


कराड : सोने खरेदीच्या बहाण्याने सराफ प्रवीण प्रभाकर आणवेकर (वय 47, रा. कीर्तनकार अपार्टमेंट, भोजन गल्ली, शहापूर, जि. बेळगाव, कर्नाटक) कराडमध्ये बोलावून त्यांच्याकडील तब्बल 35 लाख रुपयांची रोकड लुटल्याप्रकरणी कराड शहर पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करून, दोघांना अटक केली आहे. अणवेकर यांना मंगळवार पेठेतील एका पडक्या वाड्यात बोलावून मारहाण करण्यात आली होती. दि. 13 ऑगस्ट रोजी दुपारी घडलेली ही घटना रविवारी उघडकीस आली.

याबाबत आणवेकर यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी मुरलीधर उर्फ अनिकेत शेवाळे (रा. कराड) आणि अन्य एकाला अटक केली आहे. तिसरा संशयित पसार झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बेळगाव जिल्ह्यातील शहापूर येथे राहणारे सराफ प्रवीण आणवेकर यांची त्याच परिसरात साईराज नामक एका युवकाशी ओळख होती. कराड येथील मुरलीधर ऊर्फ अनिकेत शेवाळे याच्याकडे सोने असून, तो कमी पैशात सोने विकत असल्याचे साईराजने आणवेकर यांना काही महिन्यांपूर्वी सांगितले. साईराजच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आणवेकर यांनी मुरलीधर शेवाळे याच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी 35 लाख रुपयांत अर्धा किलो सोने देतो, असे शेवाळेने सांगितले होते. व्यवहार ठरल्यानंतर आणवेकर हे 35 लाख रुपये घेऊन, दि. 13 ऑगस्ट रोजी दुपारी कराडला आले. त्यांना घेऊन संशयित मंगळवार पेठेतील निरंजन कुलकर्णी यांच्या पडक्या वाड्यात गेले. तेथे संशयितांनी आणवेकर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून, 35 लाख रुपये असलेली बॅग हिसकावून पोबारा केला.

याबाबत आणवेकर यांनी रविवारी कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून, संशयितांचा शोध सुरू केला. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांचे पथक संशयितांचा शोध घेत असताना, मुरलीधर शेवाळे आणि अन्य एक जण त्यांच्या हाती लागला. सपोनि भापकर तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जगातील सर्वोत्कृष्ट शिक्षण तज्ञांमध्ये साताऱ्याच्या विद्यादीप फाउंडेशनचे संस्थापक डॉ. दीपक ताटपुजे यांचा समावेश
पुढील बातमी
नाईकबोमवाडी औद्योगिक वसाहतीत 'मेगा प्रोजेक्ट' देऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; फलटण येथे १ हजार ३५२ कोटीच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण

संबंधित बातम्या