फलटण : दोन दिवसात ३५०० रूपये दर जाहीर करावा अन्यथा साखर कारखान्यासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.
साखरवाडी, ता. फलटण येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ऊस उत्पादक शेतक-यांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी राजू शेट्टी बोलत होते.
दत्त इंडिया साखरवाडी व जवाहर ( श्रीराम )शुगर या साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगामात ३३०० रूपयाची पहिली उचल जाहीर केली आहे. सातारा जिल्ह्यातील यांच्या शेजारील कारखाने ३५०० रूपये दर जाहीर केलेला आहे. शेजारील माळेगांव व सोमेश्वर या कारखान्यांनीही उच्चांकी दर देत आहेत.
याच साखर कारखान्यांच्या परिसरात पाडेगाव ऊस संशोधन केंद्र आहे. त्याठिकाणी सर्वात जास्त ऊसाची रिकव्हरी लागत आहे. मात्र या साखर कारखान्यांची जवळपास दिड टक्यांनी रिकव्हरी चोरली जात आहे.
यावेळी या साखर कारखान्यांना दोन दिवसात ३५०० रूपये दर जाहीर करण्याबाबत मुदत देण्यात आली आहे. अन्यथा साखर कारखान्यासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. फलटण तालुक्यातील शेतकरी संघटित झाला असून यावेळेस ३५०० रूपये दर घेतल्याशिवाय मागे हटायची नाही, असा निर्धार शेतक-यांनी केला आहे.