पालकमंत्री शंभूराज देसाई यांची गुगली राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय; पुणे-बंगळुरू महामार्गावर शंभूराज देसाई आणि खा. उदयनराजे भोसले यांची गळाभेट

by Team Satara Today | published on : 17 January 2026


सातारा :  पालकमंत्री शंभूराज देसाई आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील सलोखा आज पुन्हा दिसला दोन्ही नेत्यांनी पुणे बेंगलोर महामार्गावर एकमेकांची चौकशी करत आवर्जून गळाभेट घेतली.

शुक्रवारी सकाळी उदयनराजे यांनी पुणे-बंगळुरू महामार्गावरुन निघालेला मंत्री देसाई यांचा ताफा अडवून त्यांची गळाभेट घेतली. या भेटीवेळी शंभूराज देसाई यांनी ‘काल तुमचे बंधूराज म्हणाले आहेत, मिटिंग घ्या, घ्यायची का मिटिंग,’ असा प्रश्न विचारुन राजेंची गुगली घेतली. ही गुगली राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकांचे रणांगण हळूहळू तापू लागले आहे. महायुती होणार की नाही यावरुन एकीकडे काथ्याकूट सुरू असताना, भाजप, शिंदेसेना व राष्ट्रवादीकडून अंतर्गत डावपेचही आखले जात आहेत. मात्र, महायुतीचा निर्णय अद्यापही झालेला नाही. गुरुवारी साताऱ्यात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ‘मान-सन्मान राखला तरच महायुती होईल, अन्यथा पर्याय खुले आहेत,’ असा इशारा दिला होता. तर शिवेंद्रसिंहराजे यांनी ‘जिल्हा पातळीवर समन्वयाची भूमिका पालकमंत्र्यांनीच घ्यावी,’  अशी स्पष्टोक्ती माध्यमांपुढे केली होती.



महायुतीतच युतीवरुन शाब्दिक द्वंद्व सुरू असताना शुक्रवारी शंभूराज देसाई व उदयनराजे यांची भेट व दोन्ही नेत्यांमध्ये झालेला वार्तालाफ चर्चेचा विषय ठरला आहे. शंभूराज देसाई यांनी ‘तुमचे बंधूराज म्हणाले आहेत, मिटिंग घ्या; घ्यायची का मिटिंग? असा प्रश्न विचारत उदयनराजेंना बुचकळ्यात टाकले. मात्र, उदयनराजे यांनी केवळ स्मितहास्य देत या प्रश्नावर बोलणे टाळले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्यावतीने घेतल्या 120 उमेदवारांच्या मुलाखती; राजकीय चाचपणीला उमेदवारांचा जोरदार प्रतिसाद
पुढील बातमी
बॉम्बे रेस्टॉरंट चौकासह गोडोली व जिल्हा परिषद चौकातील सिग्नल यंत्रणा तात्काळ सुरू करा; अन्यथा आंदोलन - धनंजय कदम

संबंधित बातम्या