सातारा : तब्बल 22 दिवसाच्या प्रतीक्षेनंतर सातारा पालिकेची सर्वसाधारण सभा 22 जानेवारी रोजी घेण्याचे ठरले आहे .या सर्वसाधारण सभेमध्ये उपनगराध्यक्ष स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी विषय समित्यांच्या सदस्यांची संख्या निश्चित करणे, तसेच स्थायी समितीच्या तीन नामनिर्देशन सदस्यांच्या संदर्भात निर्णय घेणे इत्यादी विषयांवर चर्चा केली जाणार आहे.
सभासचिव वर्षा पाटील यांनी तयार केलेल्या अजेंड्यावर नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी स्वाक्षरी केली आणि हा सर्वसाधारण सभेचा अजेंडा सात दिवसाच्या नोटीस पूर्वक काळामध्ये नगरसेवकांना रवाना करण्यात आला. उपनगराध्यक्ष पदाच्या निवडी करता सातारा विकास आघाडीला तात्काळ बैठक घेऊन याबाबत अमोल मोहिते यांच्या समन्वयाने काम करणारा सक्षम चेहरा खासदार गटाला द्यावा लागणार आहे. यामध्ये एड. दत्ता बनकर, माजी नगराध्यक्ष निशांत पाटील, की माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यापैकी कोणाला संधी मिळणार त्यापुढे उपनगराध्यक्ष धक्का तंत्र म्हणून नवीन चेहरा देणार का ? या विषयांवर चर्चा सुरू झाली आहे. कारण निवडून आलेल्या अपक्ष नऊ नगरसेवकांपैकी सात नगरसेवक हे उदयनराजे यांच्या विचारांचे असल्याची माहिती आहे .त्यामुळे स्वीकृत सदस्यांच्या निवडीसाठी सुद्धा दोन्ही गटांकडे जोरदार राजकीय फिल्डिंग लागली आहे. पाच सदस्य निवडून द्यावयाचे आहेत .त्यामुळे कोणाला संधी मिळणार हा खरा उत्सुकतेचा विषय आहे.
उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी दुपारी बारा वाजता इच्छुक उमेदवाराला मुख्याधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल करणे,सव्वा बारा वाजता त्या अर्जाची छाननी,साडेबारा ते पावणे एक अर्ज माघारीचा कालावधी आणि एक वाजता उपनगराध्यक्ष पदाची घोषणा असा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. इच्छुक उमेदवाराने आपला अर्ज मुख्य अधिकारी अभिजीत बापट यांच्याकडे सादर करावयाचा आहे. सर्वसाधारण सभेत पीठासन अधिकारी म्हणून अमोल मोहिते हे काम करणार आहेत .यात सर्वसाधारण सभेमध्ये स्वीकृत सदस्यांच्या निवडी या पीठासन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष अमोल मोहिते जाहीर करणार आहेत. याशिवाय विषय समित्यांच्या सदस्यांची संख्या निश्चित करणे आणि स्थायी समितीसाठी तीन नामनिर्देशित सदस्यांवर चर्चा करणे इत्यादी महत्त्वपूर्ण निर्णय या सभेत घेतले जाणार आहेत.