सातारा : सातारा शहर पोलिसांनी चोरी व हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी राबविलेल्या विशेष मोहिमेत नागरिकांचे एकूण ९ लाख ६० हजार रुपये किंमतीचे ५३ स्मार्ट मोबाईल फोन हस्तगत करून ते मूळ मालकांना परत केले आहेत. या कारवाईमुळे सातारा शहरातील नागरिकांमध्ये पोलिस प्रशासनाबद्दल विश्वास आणि समाधान व्यक्त होत आहे.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांनी डी.बी. पथकाला चोरीस गेलेले मोबाईल शोधण्याबाबत सूचना दिल्या. त्यानुसार डी.बी. पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सीईआयआर पोर्टलचा वापर करून महाराष्ट्र तसेच इतर राज्यांतील मोबाईल धारकांशी संपर्क साधत मोबाईल शोधून काढले.
सातारा हे जिल्ह्याचे प्रमुख शहर असून मोठ्या बाजारपेठा, बसस्थानक, प्रवासादरम्यान तसेच गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरी व हरवण्याचे प्रमाण अधिक असते. अशा ठिकाणी गहाळ झालेले मोबाईल शोधून नागरिकांना परत केल्याने पोलिसांची ही कामगिरी कौतुकास्पद ठरत आहे.
विशेष म्हणजे जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत विविध कंपन्यांचे तब्बल २४४ मोबाईल फोन सातारा गुन्हे प्रकटीकरण शाखेने शोधून तक्रारदारांना परत केले आहेत. या सातत्यपूर्ण कार्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पो.ह.सुजित भोसले, निलेश जाधव, निलेश यादव, विक्रम माने, प्रवीण कडव, पंकज मोहिते, तुषार भोसले, सागर गायकवाड, सचिन रिटे, संतोष घाडगे, मच्छिंद्रनाथ माने, आशिकेश डोळस, वैभव माने, सुशांत कदम, सुहास कदम, तसेच सायबर विभागाचे प्रशांत मोरे, रणजीत कुंभार, ओमकार डुबल, यशवंत घाडगे, राकेश घाडगे, रामदास भास्करवाड यांनी सहभाग घेतला.