सातारा : सातारा तालुक्यातील संभाजीनगर परिसरातील खिंडवाडी येथे एका बंद घराचे कुलूप तोडून अनधिकृत प्रवेश केल्याची आणि मालमत्तेची तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आयडीबीआय बँकेचे सहाय्यक महाप्रबंधक अजयकुमार श्रीबद्री रविदास (वय ५३) यांनी सातारा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून शंकर बाळासो तोडकर आणि अल्पना शंकर तोडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खिंडवाडी येथील आर.एस. नं. प्लॉट ८१५/८/२/B/५/C/B या मिळकतीमध्ये संशयित आरोपींनी बेकायदेशीररित्या प्रवेश केला. आरोपींनी प्रथम मिळकतीच्या मुख्य गेटचे कुलूप तोडले आणि त्यानंतर घरातील सर्व दरवाजांची कुलपे तोडून आत प्रवेश मिळवला. घरात शिरल्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली असून, तिथे लावलेला बॅनरही फाडून टाकला आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, संशयितांनी घराचे नुकसान करून अनधिकृतपणे ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार मोरे करत आहेत.