सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यामध्ये गुरुपौर्णिमा विधिवत परंपरेने वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने शहरासह ठिकठिकाणी तालुक्यांमधून धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गोंदवले येथील ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज तसेच सातार्यातील गोडोली येथे साईबाबा मंदिर, आनंदवाडी दत्त मंदिर येथे दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
सातारा शहरामध्ये गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने फुलांच्या बाजारामध्ये मोठी उलाढाल झाली. नाजूक चणीच्या मोठ्या गुलाबांना विशेष करून मागणी होती. येथील स्वराज मंगल कार्यालयामध्ये हिंदू जनजागृती समितीच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गुरुभक्ती गुरुवंदना, शंखनाद महोत्सव तसेच शस्त्र प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सातारकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सातार्यातून दत्तगुरूंचे दर्शन घेण्यासाठी नारायणपूरला जाणार्या भाविकांची मोठी गर्दी झाली होती. सातारा बस स्थानकाच्या वतीने गोंदवले, नारायणपूर तसेच नरसोबाची वाडीला जाण्यासाठी विशेष वाहनांचे आयोजन करण्यात आले होते. गोडोली येथील साईबाबा मंदिरामध्ये साई चरणी भाविकांनी आपली सेवा अर्पण केली. या निमित्ताने विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते. सातारा शहरातील वेगवेगळ्या स्वामी समर्थ मठांमध्ये गुरुपौर्णिमा सुद्धा मोठ्या उत्साहात सादरी करण्यात आली. गुरुपौर्णिमा हा दिवस गुरुजनांबद्दल आदर व्यक्त करण्याचा आणि त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. शाळा-विद्यालयांमध्ये गुरूंच्या प्रति आदर भाव व्यक्त करणार्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सातारा शहरातील कन्याशाळा, न्यू इंग्लिश स्कूल, अनंत इंग्लिश स्कूल तसेच करंजे येथील श्रीपतराव पाटील शाळेमध्ये गुरुवंदना कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. समाज माध्यमांवर सुद्धा गुरुभक्तीची महिमा सांगणारे अनेक संदेश व्हायरल होत होते.