किल्ले अजिंक्यतारा सुशोभीकरण, संगम माहुली महाराणी ताराबाई स्मारक उभारण्यास मंजुरी ; ना. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ग्रीन सिग्नल

by Team Satara Today | published on : 06 March 2026


सातारा : ऐतिहासिक सातारा येथील संगम माहुली येथे महाराणी ताराबाई समाधी परिसराचा विकास व सुशोभीकरण करणे आणि अजिंक्यतारा किल्ल्याचे सुशोभीकरण व संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून संगम माहुली येथे महाराणी ताराबाई समाधी परिसराचा विकास व सुशोभीकरणासाठी १३३ कोटी रुपये तर, किल्ले अजिंक्यतारा सुशोभीकरण व संवर्धनासाठी १३५ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. याबद्दल ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य सरकारचे आभार मानले आहेत. 

ना. शिवेंद्रसिंहराजेंच्या अभ्यासपूर्ण पाठपुराव्यामुळे पर्यटनवाढीच्या दृष्टीने आणि ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धनाच्या दृष्टीने हा महत्वकांक्षी प्रकल्प मंजूर झाला असून यामुळे साताऱ्याच्या सौंदर्यात आणि ऐतिहासिक वैभवात मोठी भर पडणार आहे. हा प्रकल्प मंजूर करून घेतल्याबद्दल जिल्हावासियांमधून समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, पर्यटनवाढीसाठी आणि पर्यटकांच्या वेळेची, पैशांची बचत आणि शारीरिक कष्ट टाळण्यासाठी किल्ले वासोटावर जाण्यासाठी मुनावळे ते किल्ले वासोटा या रोप वेला ना. शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीवरून मंजुरी देण्यात आली आहे. कराड येथील विमानतळाचा विकास करणे व विमानतळावर नाईट लँडिंगला देखील मंजुरी देण्यात आली असून, सातारा जिल्ह्यातील विविध विकासकामांना भरीव निधी मंजूर केल्याबद्दल आणि राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय घेतल्याबद्दल ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि राज्य सरकारचे आभार मानले आहेत. 

महाराणी ताराबाई यांचे संगम माहुली येथे स्मारक उभारणे आणि संगम माहुली परिसर सुशोभित व विकसित करणे तसेच किल्ले अजिंक्यताराचे सुशोभिकरण व संवर्धन करणे या कामांना मंजुरी मिळवण्यासाठी ना. शिवेंद्रसिंहराजे यांचा पाठपुरावा सुरु होता. ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने या कामाचा परिपूर्ण प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला होता. ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री फडणवीस यांनी चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात या कामांना मंजुरी दिली आहे. त्यांनी त्यांच्या भाषणात याचा उल्लेख करून या कामांना निधी उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. अजिंक्यतारा किल्ला, ताराराणी समाधी व इतर संबंधित वारसा स्थळांचे संवर्धन, सुशोभीकरण व विकास करण्यासाठी एकूण सुमारे ३५८ कोटींचा विकास प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. यामुळे साताऱ्याच्या विकासाला मोठा बूस्टर मिळणार असून पर्यटनवाढीला मोठी चालना मिळणार आहे. 

अशी आहे अजिंक्यतारा किल्ला विकास योजना

ऐतिहासिक अजिंक्यतारा किल्ल्याचे सुशोभीकरण व संवर्धन करण्यासाठी सुमारे १३५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. यामध्ये किल्ल्यावरील राजसदर, बुरुज, तटबंदी यांची दुरुस्ती करणे, पर्यटकांसाठी विविध सुविधा निर्माण करणे, अत्याधुनिक प्रकाश व्यवस्था आणि परिसराचा विकास करणे याचा समावेश आहे. 

संगम माहुलीचा होणार कायापालट  

संगम माहुली येथे असलेल्या महाराणी ताराराणी समाधी परिसराचा विकास व सुशोभीकरणासाठी सुमारे १३३ कोटी रुपये निधी मंजूर झाला असून या परिसरातील नदी घाट परिसर सुशोभीकरण व संवर्धन, येथील विविध मंदिरांची दुरुस्ती, याठिकाणी असलेल्या सर्व स्मारकांचे संवर्धन, पर्यटकांसाठी विविध सुविधा निर्माण करणे यासह संपूर्ण परिसर सुशोभीकरण आदी कामे केली जाणार आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
घरपट्टी थकबाकीदारांवर सातारा पालिकेची धडक कारवाई; शहराच्या पश्चिम भागातील तीन फ्लॅट सील
पुढील बातमी
शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून जोरदार आवाज उठवत आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीने केली राज्य सरकारची कोंडी

संबंधित बातम्या