सातारा : पाटण तालुक्यातील हुंबरळी गावाचे 21 जुलै 2021 रोजी ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसाने भूस्खलन होऊन संपूर्ण गाव बाधित होऊनही गावाला कायमस्वरूपी पुनर्वसनापासून गेले तीन वर्ष वंचित राहावे लागले होते. याबाबत आज जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी एका महिन्यात सर्व गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावू. सदर गावच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाची जबाबदारी शासनाची आहे, असे सांगितले.
जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न तात्काळ सोडविल्यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे, पाटण तहसीलदार अनंत गुरव, गावचे अध्यक्ष नरेश देसाई व ग्रामस्थ उपस्थित होते.
2021 मध्ये झालेल्या भूस्खलनामध्ये हुंबरळी गावाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामध्ये तीन घरे जमीनदोस्त झाली होती, तर संपूर्ण गाव बाधित झाले असताना हुंबरळी गावातील फकत पाच घरांचे पुनर्वसन करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. उर्वरित गावाला वगळण्यात आले होते. याबाबत ग्रामस्थांच्यावतीने तीन वर्षे प्रयत्न करण्यात येत होते. मात्र त्याला यश येत नव्हते. म्हणून 15 ऑगस्ट रोजी बेमुदत आमरण उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी उपविभागीय अधिकारी टोपे, तहसीलदार अनंत गुरव यांनी विनंती करून उपोषण मागे घेण्याबाबत विनंती केली करून जिल्हाधिकारी यांचे सोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज जिल्हाधिकारी यांच्यासमवेत बैठक झाली. त्यामध्ये जिल्हाधिकारी डूडी यांनी हुंबरळी गावातील 227 कुटुंबाचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याबाबत एक महिन्यात तत्काल निर्णय घेण्याचे मान्य केले. डूडी यांच्यासमवेत आज घेतलेल्या निर्णयाचे हुंबरळी ग्रामस्थांनी स्वागत केले असून असे कार्यतत्पर जिल्हाधिकारी आपल्या जिल्ह्याला मिळाले आहेत हे जिल्ह्याचे भाग्य आहे, असे गौरवोद्गार काढले.
या बैठकीला हुंबरळी सरपंच सौ. रेश्मा कांबळे, रवींद्र देसाई, टी. एल. देसाई, बाजीराव देसाई, गणेश देसाई, भरत देसाई, बी. के. देसाई, लक्ष्मण देसाई, सीताराम देसाई, गोविंद चाळके, महेद्र देसाई, वाल्मीक देसाई, संजय देसाई, शिवाजी देसाई, विनायक देसाई आदी उपस्थित होते.
‘हुंबरळी’ पुनर्वसनाचा प्रश्न लवकरच मार्गी लावू
जिल्हाधिकारी यांचे ग्रामस्थांना आश्वासन
by Team Satara Today | published on : 26 August 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा