सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात शिक्षण सहाय्यक महिला लाचलुचपतच्या जाळ्यात सापडली. मात्र कालबद्ध पदोन्नतीच्या मंजुरीसाठी साहेबांच्या नावाखाली तिने 25 हजार रुपये घेतले. झेडपीत पैसे घेणारा असा कोण साहेब ?हा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे.
एखाद्या घटने निमित्त जो घावला तो चोर पण पडद्यामागे होणारी चिरीमिरीची देवाणघेवाण खणून काढण्याचे सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्यापुढे आव्हान आहे. शिक्षक संच मान्यता असो किंवा मुख्याध्यापकांच्या पदोन्नती असो शिक्षण विभागात चिरीमिरीचे वजन ठेवल्याशिवाय काम होत नाही अशी ओरड होत आहे. अनेक खाजगी संस्था चालक शिक्षक यांना केवळ लक्ष्मीदर्शनासाठी फाईलमध्ये वेगवेगळ्या त्रुटी काढून टाचा घासायला लावले जाते या प्रकरणाचा भांडाफोडशिक्षण सहाय्यक महिलेच्या निमित्ताने झाला आहे.
शिक्षण विभागाची झाडाझडती हवी
माध्यमिक विभागातील अधिकारी लाचलुचपच्या जाळ्यात सापडला खरा पण तक्रारदाराने मांडली आहे की त्या अधिकाऱ्याने साहेबांना देण्यासाठी 25000 लाच मागितली. यावरून सापडलेला अधिकारी दोषी म्हणायचा की संबंधित साहेब. हा संबंधित साहेब कोण ? याविषयी भले मोठे प्रश्नचिन्ह आहे. लाच लुचपत विभागाच्या पथकाने दक्ष सप्ताह साधून या मोठ्या साहेबाचा सुद्धा मागोवा घेणे गरजेचे आहे यामुळे बऱ्याच बाबी तपशीलात पुढे समोर येणार आहेत.नागराजन मॅडम यांनी शिक्षण विभागाची झाडाझडती घेणे गरजेचे बनले आहे.
यशवंत विचारांच्या जिल्हा परिषदेत चालले काय ?
सातारा जिल्हा हा यशवंत विचारांचा जिल्हा समजला जातो .सातारा जिल्हा परिषदेच्या कारभाराला महाराष्ट्रात वेगळी उंची आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील ही पैशाची जिरवाजिरवी हा न संपणारा विषय आहे .प्रस्ताव मंजूरच्या मागचे हे अर्थकारण अत्यंत घाणेरडे असून त्याला संबंधित अधिकाऱ्यांची मूक मान्यता असते. मग सापडला तो चोर आणि अंगाशी आल्यावर मी त्यातला नव्हेच अशी सोयीस्कर भूमिका घेणारे अधिकारी यापूर्वी अनेकदा सुटून गेले आहेत. शिक्षण उपसंचालक पदापर्यंत पदोन्नती साधणाऱ्या बऱ्याच जणांनी यापूर्वीही येथील वाहत्या गंगेत हात धुतले आहेत .मात्र त्याचा पर्दाफाश झाला नाही. दहा वर्षांपूर्वी सुद्धा याच शिक्षण विभागांमध्ये एका शिक्षणाधिकाऱ्याला लाच घेताना पकडण्यात आले होते. त्याच प्रकरणाची पुनरावृत्ती एका दशकानंतर झाली आहे. माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षण अधिकारी धनंजय चोपडे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला असता त्यांनी संबंधितांनी काय केले माहित नाही. माझा या घटनेची संबंध नाही असे स्पष्टीकरण दिले आहे.