मुंबई : राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी येत्या १८ नोव्हेंबरपूर्वी ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत देण्यात आलेली आहे. महिलांनी या कालावधीत आपले ई केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी आणि लाभार्थी महिलांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा यासाठी ई केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत अदिती तटकरे यांनी बुधवारी मंत्रालयात बैठक घेतली.
१८ सप्टेंबर २०२५ पासून ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ई केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी २ महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरित लाभार्थी महिलांनी १८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन तटकरे यांनी केले आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखाच्या आत असावे अशी अट टाकली आहे. मात्र अनेक अपात्र महिला या योजनेचा लाभ घेत असल्याचे दिसून आले आहे. त्यांना वगळण्यासाठी राज्य सरकारने ई केवायसी बंधनकारक केले आहे.