महाविकास आघाडीच्या नेत्यांना पराभव दिसू लागलाय ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साताऱ्यात सडकून टीका

by Team Satara Today | published on : 15 October 2025


सातारा :   महाविकास आघाडीच्या पक्षांसह सर्व नेत्यांनी एकत्र येऊन राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक पुढे ढकलण्याची विनंती करणे म्हणजे त्यांना निवडणुकीला सामोरे जाण्याचा आत्मविश्वास गमावलेला आहे. महायुती यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही जिंकणार असे वातावरण असल्यामुळे महाविकास आघाडीचे नेत्यांनी आत्मविश्वास गमावलेला आहे. त्यांच्या पायाखालील वाळू सरकलेली आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यात केली. 

पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या कोयना दौलत या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, महाविकास आघाडीचे नेते सध्या बेछूट  विधाने करीत आहेत. सर्व महाविकास आघाडीच्या पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक आयोगाची भेट घेणे आणि त्यांनी मतदार यादी अद्ययावत नसण्याबाबत तक्रारी करणे निवडणूक पुढे ढकलण्याची भाषा करणे म्हणजे त्यांना स्पष्ट पराभव दिसू लागला आहे. निवडणुकीला सामोरे जाण्याची ताकद आणि मानसिकता त्यांच्यात नसल्यामुळे त्यांनी आत्मविश्वास गमावलेला आहे तसेच भीतीने त्यांची पायाखालची वाळू सरकू लागली आहे. 

ईव्हीएम मशीनच्या संदर्भाने यंदाची स्थानिक स्वराज्य संस्थांनी बॅलेट पेपरवर घ्यावी, अशी सुद्धा मागणी महाविकास आघाडीचे नेत्यांनी केली यासंदर्भात एकनाथ शिंदे यांना छेडले असतात ते म्हणाले, ईव्हीएम मशीनची संस्कृती ही काँग्रेसच्या काळातील आहे. पूर्वी निवडणुका बॅलेट पेपर वरच होत होत्या. मात्र ईव्हीएम हे प्रकरण काँग्रेसने आणलेले आहे. सध्या महायुतीचे सरकार प्रचंड आत्मविश्वासाने आणि विकासाचे काम करत आहे. त्यामुळे आम्हाला कोणतीही भीती नाही. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी निवडणूक आयोग हा राज्य सरकारसाठी काम करतो असा आरोप केला होता. या आरोपावर बोलताना ते म्हणाले, ज्यावेळी यांच्या जागा निवडून येतात किंवा सत्तेत जाण्याच्या प्रयत्नात ते असतात.  त्यावेळी निवडणूक आयोग हा चांगला असतो, तेव्हा त्यांना कोणतीही तक्रार नसते. मात्र महायुतीला यश मिळायला लागल्यावर त्यांच्या 232 जागा विधानसभेत निवडून आल्यानंतर त्यांना राज्य निवडणूक आयोगाच्या कामांमध्ये त्रुटी दिसू लागतात, अशी टीका त्यांनी केली


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील आरक्षणावरील हरकती व सुचना सादर करण्याचा कालावधी 17 ऑक्टोबरपर्यंत
पुढील बातमी
सज्जनगडावरील पार्किंगमध्ये वृद्धास मारहाण केल्याने एकावर गुन्हा

संबंधित बातम्या