सातारा : इंटरनॅशनल कौन्सिल फॉर स्मॉल बिजनेस (आयसीएसबी) वॉशिंग्टन (अमेरिका) या ७० वर्ष जुन्या आंतरराष्ट्रीय संस्थेने जगातील सहा सर्वोत्कृष्ट उद्योजकीय शिक्षणतज्ञांची नुकतीच निवड केली असून त्यामध्ये साताऱ्याच्या विद्यादीप फाउंडेशनचे संस्थापक व शिक्षण तज्ञ प्रा. डॉ. दीपक ताटपुजे यांचा समावेश केल्याचे नुकतेच जाहीर केले आहे.
उद्योजकीय शिक्षण क्षेत्रातील डॉ. ताटपुजे यांच्या ग्रामीण भागातील उद्योजकीय प्रसाराचे कार्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील केलेल्या संशोधनाचा विचार करून ही निवड करण्यात आली आहे, अशी माहिती विद्यादीपचे अध्यक्ष दामोदर मेढेकर आणि सचिव डॉ. विद्या ताटपुजे यांनी दिली. यामध्ये डॉ. ताटपुजे यांचे सह प्रा. जाणिना सुंदरमायर (जर्मनी) डॉ. वाडे हाल्वोर्सन (ऑस्ट्रेलिया) डॉ. नवीन शलाबी (इजिप्त) प्रा. मारिओ कार्रासी (इटली) आणि डॉ. आश्रफ शेटा (इजिप्त) यांचा समावेश आहे.
कैरो (इजिप्त) या ठिकाणी नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या "उद्योजकीय आणि लघुउद्योग काँग्रेस" या जागतिक परिषदेत या सहा व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार असून जागतिक पुरस्कारासाठी नामांकन ही देण्यात आले आहे. यसीएसबी, वॉशिंग्टन या जागतिक संस्थेने अत्यंत सुप्रतिष्ठेच्या "वैश्विक उद्योजकता शिक्षणतज्ञ" निवडीसाठी डॉ. ताटपुजे यांनी आभार मानले आहेत.