आई-वडिलांना जेवण पोहोचवण्यासाठी निघालेल्या तरुणावर काळाचा घाला; कारची स्कुटीला जोरदार धडक, जागीच मृत्यू

by Team Satara Today | published on : 08 April 2026


मेढा  :  वडिलांवर उपचार सुरू असताना आई-वडिलांना जेवण पोहोचवण्यासाठी निघालेल्या तरुणावर काळाने घाला घातल्याची दुर्दैवी घटना आज घडली आहे. दिपक आनंदा कांबळे (वय २६, रा. डांगरेघर ता. जावली) याचा भणंग गावाच्या हद्दीत झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे केळघर व मेढा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिपक कांबळे हा मेढा येथून साताऱ्याकडे स्कुटीने जात असताना भणंग गावाजवळील माऊली हॉल परिसरात समोरून येणाऱ्या टाटा पंच (एमएच ०८ बीई ८४२६) या कारची त्याच्या स्कुटीला जोरदार धडक बसली.

या अपघातात दिपकचा जागीच मृत्यू झाला. दिपकचे वडील सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून त्यांना जेवण देण्यासाठी तो निघाला होता. मात्र दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आणि त्यातच त्याचा दुर्दैवी अंत झाला. घटनेची माहिती मिळताच मित्र, नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी केली. दिपक हा सर्वांशी मिळून मिसळून राहणारा व सर्वांचा लाडका असल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. बैल शर्यतीची त्याला विशेष आवड होती, अशी माहिती मित्रांनी दिली.

याप्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू असून संबंधित चारचाकी वाहन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, सातारा-केळघर मार्ग हा अपघातांचा धोकादायक पट्टा ठरत चालला आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्ह्यात जनगणना 2027 साठी जोरदार तयारी सुरू; दोन टप्प्यांत पार पडणार; सक्रिय सहभाग नोंदवून गणना कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन

संबंधित बातम्या