अखंड शुभेच्छांच्या वर्षावामध्ये जलमंदिर चिंब

खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; कार्यकर्त्यांचा लोटला महासागर

by Team Satara Today | published on : 24 February 2025


सातारा : आपल्या बेधडक आणि रोखठोक अंदाजासाठी प्रसिद्ध असलेले सातार्‍याचे खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस सातारा शहरासह जिल्ह्यात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांची अखंड गर्दी, शुभेच्छांचे फोन, सातार्‍यात फटाक्यांची आतषबाजी अशा उत्साही वातावरणामध्ये अखंड शुभेच्छांच्या वर्षावामध्ये जलमंदिर अक्षरशः न्हाऊन निघाले.

सोमवारी मध्यरात्रीपासूनच कार्यकर्त्यांनी उदयनराजे यांच्या वाढदिवसाची जोरदार तयारी केली होती. प्रीतम भाऊ कळसकर यांच्या वतीने राजवाडा, तर रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशील मोझर यांच्या वतीने पोवई नाका येथे केक कापून वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली.  राजवाडा येथे शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उदयनराजे यांनी रात्रीच केक कापला. आया हे राजा लोगो रे लोगो, एक बार मैने कमिटमेंट कर दी तो... अशा सुप्रसिद्ध डायलॉग स्पीकरवर ऐकायला येत होते. संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असणार्‍या शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या मंदिरात खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष महापूजेचे आयोजन करण्यात आले होते.

प्रतापसिंह उर्फ दादा महाराज क्रिकेट चषक स्पर्धेचे बक्षीस वितरण, तसेच सुभाषचंद्र बोस चौकातील टी 55 रणगाड्याचे अनावरण, रविवार पेठेतील गोशाळेमध्ये गाईंना चारा व खुराक वाटप, वळसे येथील एहसास शाळेच्या मतिमंद मुलांना तसेच जिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना भोजन अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या वेगवेगळ्या उपक्रमांना उदयनराजे यांनी आवर्जून हजेरी लावली. पुणे येथील उदयनराजे यांचे कट्टर समर्थक राम देवकर यांनी चक्क चांदीचे सिंहासन आणून ते उदयनराजे यांना भेट म्हणून दिले. या आगळ्यावेगळ्या भेटवस्तूची चांगलीच चर्चा झाली.  सायंकाळी राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी उदयनराजे भोसले यांना ओवाळून औक्षण केले आणि शुभाशीर्वाद दिले. येथील भवानी मातेचे दर्शन घेऊन उदयनराजे कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी कार्यक्रमस्थळी दाखल झाले.

यावेळी उदयनराजे आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा उत्साही घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. रात्री उशिरापर्यंत जलमंदिरवर शेकडो कार्यकर्त्यांची उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देण्यासाठी रिघ लागली होती. जलमंदिर निवासस्थानाच्या बाहेर शुक्रवार पेठेतील सटवाई मंदिर चौक कार्यकर्त्यांनी पूर्णतः भरून गेला होता. सातत्याने येणारे फोन, कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा अशा जल्लोषी वातावरणामध्ये उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस साजरा झाला.

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील, ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार मनोज घोरपडे, आमदार अतुल भोसले यांनी उदयनराजे भोसले यांना दूरध्वनीवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही सातार्‍यात येण्याचे नियोजन ठरले होते. मात्र कार्य व्यस्ततेमुळे ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. तरी त्यांनी उदयनराजे भोसले यांना दूरध्वनीवरून वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा दिल्या.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हाधिकारी कार्यालयाचे कर्मचारी संतोष नलावडे यांचे अपघाती निधन
पुढील बातमी
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी

संबंधित बातम्या