सातारा : सातारा शहरालगतच्या उपनगरांना होत असणाऱ्या अपुऱ्या पाणीपुरवठा सह इतर तांत्रिक समस्यांच्या संदर्भात आयोजित बैठकीमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ढिसाळ कारभाराचा पंचनामा झाला. योजनांची पूर्तता नसणे गळती काढण्यास विलंब होणे दूषित पाणीपुरवठा होणे आणि अधिकाऱ्यांची दुरुत्तरे यामुळे बैठकीत संतप्त झालेल्या नगरसेवकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना कारभार सुधारा अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकू, असा सज्जड दम दिला.
सातारा पालिकेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी शाहूनगर गोडोली सदरबाजार तसेच समाधीचा माळ मोरे कॉलनी हद्दवाढ क्षेत्रातील नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांची अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या समस्येवर बैठक बोलवली होती. या बैठकीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे शाखा अभियंता एम. आर. जंगम उपाभियंता अनिल शिरपूरकर, शाखा अभियंता एल. एम. गडकरी, उपाभियंता भीम देशमुख, कनिष्ठ अभियंता एस. आर. कुंटे, पाणीपुरवठा अभियंता दिग्विजय गाढवे आणि ऋत्विक माळवे यावेळी उपस्थित होते.
नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्यासह हेमलता भोसले, फिरोज पठाण, अविनाश कदम, अक्षय जाधव, सुशांत महाजन,विश्वतेज बालगुडे,भारती सोळंकी मुख्याधिकारी अभिजीत बापट पाणीपुरवठा विभागाच्या अभियंता शहाजी वाठारे, नगराध्यक्षांचे स्वीय सहाय्यक श्रीकांत गोडसे इत्यादी बैठकीला उपस्थित होते .
या बैठकीमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता अजित वाघमारे मात्र अनुपस्थितीत होते. यावरून सुद्धा नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शाहूनगर परिसरात अपुऱ्या पाणीपुरवठा योजना जगतापवाडी तसंच 19 कॉलनीमध्ये पाणी न मिळणे, उताराने पाणी वाहून जाणे, काही योजनांचे हस्तांतरण नगरपालिका की महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यावरून वाद झाल्याने अनेकतक्रारींचा पाढा वाचला गेला. फिरोज पठाण यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे काही अधिकारी काम करत नाही असा स्पष्ट आरोप करत त्यांच्यासमोर गढूळ पाण्याचा जारच टेबलावर मांडला.
अमोल मोहिते यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेत नागरिकांच्या अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या समस्येवर आपण तात्काळ काय ॲक्शन घेतली असा जाब विचारला. मोरे कॉलनी समाधीचा माळ पाटील नर्सरी परिसर या भागांमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पाणी कोटेश्वर टाकीच्या माध्यमातून पोहोचते तेथे किती कनेक्शन दिली स्मार्ट मीटर का बसले नाहीत असा सवाल अविनाश कदम यांनी केला. गडकरी मॅडम यांनी आम्ही तेथे बल्क पाणी देतो त्यामुळे त्याची येणारी बिले ही काही ठराविक पटीमध्ये असतात, असे उत्तर देताना अविनाश कदम संतापले. तुम्ही किती मीटर बसवले याचा हिशोब द्या असा जाब त्यांनी विचार कारभार सुधारा नाहीतर मी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयाला टाळे ठोकेल असा रोखठोक इशारा दिला.
हेमलता भोसले यांनी शाहूनगर येथे १९ कॉलन्यांना पाणी येत नसल्याची तक्रार केली. तर जगतापवाडी परिसर हा चढावर असल्यामुळे तेथे पाणी येत नाही तेथे पाण्याचे आपण काय नियोजन केले असा आक्रमक सवाल सुशांत महाजन यांनी केला. फिरोज पठाण यांनी सुद्धा बापूजी साळुंखेनगरमध्ये अपुरा पाणीपुरवठा होतो. पंधरा-पंधरा दिवस गळती काढली जात नाही बऱ्याच प्राधिकरणाच्या पाईपलाईनला पाणीच नसते विशिष्ट इमारतींना दोन इंची कनेक्शन दिल्यानंतर त्या पुढील घरांना पाणीच मिळत नाही त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही आम्ही लोकप्रतिनिधी आहोत याची उत्तरे आता आम्हाला द्यावी लागणार आहेत .
त्यामुळे तात्काळ कारभार नाही सुधारला तर सर्व योजना तुमच्याकडून काढून घेऊन कार्यालयाला टाळे ठोकू, असा धडक पवित्रा फिरोज पठाण यांनी सुद्धा घेतला .नगराध्यक्ष निशांत पाटील यांनी सदर बाजार परिसरातील विशेषता भिमाबाई आंबेडकर झोपडपट्टीला पाणी मिळत असल्याची तक्रार केली. सदर बाजार कॅन्टोन्मेंट परिसरातील पाण्याच्या टाकीची गळती अनेक महिने निघालेली नाही तो व्हॉल्व दुरुस्त करण्याची तरी आपल्याकडे तरतूद आहे का असा प्रश्न शाखा अभियंता अनिल कुमार जंगम यांना विचारला. या निवडणुकीत मी निवडून आलो जर पडलो असतो तर केवळ आपल्या अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे पडलो असतो अशी जहरी टीका त्यांनी केली.
अपुरा पाणीपुरवठा , गळती न निघणे, दूषित पाणीपुरवठा या सर्व समस्यांवर तुम्ही तात्काळ काय ॲक्शन प्लॅन घेणार ? याचा दोन दिवसात आराखडा बनवा. तसेच ज्या योजनांच्या हस्तांतरणाच्या अडचणी आहेत आणि तांत्रिक त्रुटी आहेत त्या पूर्ण करून त्याची माहिती नगरपालिकेला द्या या संदर्भात पुन्हा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत मंगळवारी बैठक घेण्याचे आश्वासन नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी दिले .
शिवतीर्थाला एक थेंब सुद्धा पाणी नाही
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व नगरपालिका यांच्यात अपुऱ्या पाणीपुरवठ्या संदर्भात आयोजित बैठकीमध्ये वेगळीच गोष्ट समोर आली पोवई नाक्यावरील सर्वसाधारकांची अस्मिता असणाऱ्या शिवतीर्थावरील शिव पुतळा परिसराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने एक इंची पाईपलाईनचे कनेक्शन दिले आहे .मात्र त्याला एक्सप्रेस फीडर मंजूर नसल्यामुळे तेथे पाणी उपलब्ध होत नाही .त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला जलाभिषेक करताना समोरील खाजगी दुकानाकडून एकदोन बादल्या पाणी घ्यावे लागते अशी तक्रार बैठकीला आयोजित शिवभक्तांनी केली .बैठकीनंतर सुद्धा अनिल कुमार जंगम आणि शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांची जोरदार वादावादी झाली .हा परिसर सातारा जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असून अभियंता एम एम मोदी यांच्या माध्यमातून या सर्व परवानगी देण्यात आलेल्या आहेत .तेव्हा शिवभक्तांनी त्यांना सांगितले परवानगी जिल्हा परिषदेची असली तरी पाणी देण्याचे काम तुमचे आहे .शिव पुतळा परिसराला जर पाणी नसेल तर या स्मारकाचा आणि तेथील परिसराचे सौंदर्य कसे टिकवायचे असा संतप्त सवाल त्यांनी केला .
अजित वाघमारे यांची बैठकीला दांडी
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता अजित वाघमारे यांनी शुक्रवारच्या बैठकीला दांडी मारली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संदर्भातील अनेक धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार हा वाघमारे यांना आहे मात्र त्यांनी शाखा अभियंता आणि उपअभियंता यांना बैठकीला पाठवून आपल्याला बैठकीचे गांभीर्य नसल्याचे दाखवून दिले .त्यांच्या अनुपस्थितीबद्दल नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. वाघमारे हे तीन तीन दिवस कार्यालयात नसतात तसेच कार्यालयात येणाऱ्या ठराविक लोकांना ते भेटतात अशी सर्वसामान्य लोकांची तक्रार आहे .महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी नागरिकांशी घेणं देणं नसल्यासारखे बोलत असतात त्यांना बोलायची पद्धत नसते,सदर बाजार सारख्या परिसरामध्ये अनेक नागरिकांना कनेक्शन देण्यात आली आहेत मात्र वर्ष वर्ष त्यांची बिले पाठवण्यात आलेली नाही .जर एकदम हजारो रुपयांची बिले आली तर ती कुठून भरायची असा थेट सवाल नगरसेवक अक्षय जाधव यांनी केला. तर मंगळवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सुट्टी घ्यायची बंद करावे. मंगळवारचे लोड शेडिंग हे बंद करण्यात आले आहे तरीसुद्धा हे अधिकारी मंगळवारी पाणी सोडत नाही त्यामुळे शाहूपुरी भागातील नागरिकांना फुकटचा मनस्ताप सोसावा लागतो, अशी आक्रमक मांडणी विश्वतेज बालगुडे यांनी केली.