सिम्बोयसिस हॉस्पिटल ते राजमाता सुमित्राराजे उद्याना दरम्यान पोलिसांच्या गस्तीची गरज

त्रस्त महिलांची मागणी; गुटखा खावून थुंकणार्‍यांमुळे आरोग्याचा प्रश्‍न गंभीर

by Team Satara Today | published on : 16 January 2025


सातारा : येथील कुपर बंगल्याजवळ असणार्‍या सिम्बोयसिस हॉस्पिटल ते राजमाता सुमित्राराजे उद्यानादरम्यान असणार्‍या रस्त्यावर शहरातील अनेक टवाळखोर युवकांच्या टोळक्याने दुचाकीवर बसून खाल्लेला गुटखा व मावा थुंकल्यामुळे या रस्त्याचा रंगच बदलून लाले लाल झाला आहे. त्यामुळे या रस्त्यांवरुन अबालवृद्ध तसेच महिलांना चालणेही मुश्कील झाले आहे. त्यानुषंगाने सातारा शहर पोलिसांनी या टवाळखोर टोळक्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी महिलांमधून होत आहे.

खोपोली, जि. रायगड येथील रस्त्यांवर गुटखा खावून थुंकणार्‍या एका युवकाला तेथील महिला दक्षता समितीच्या सदस्या शिल्पा मोदी यांनी चांगलाच दणका दिल्याचे वृत्त विविध वृत्तपत्रांमध्ये नुकतेच झळकले होते. मोदी यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी रस्त्यावर थुंकणार्‍या तरुणावर दंडात्मक कारवाई केली होती. त्यामुळे याची चर्चाही राज्यभरात चांगलीच झालेली आहे. असे असताना गेल्या काही वर्षांपासून कुपर बंगला, सिम्बोयसिस हॉस्पिटल व राजमाता सुमित्राराजे उद्यानादरम्यान सातारा शहरातील अनेक टवाळखोर युवक दुचाकीवरुन येत याठिकाणी टोळक्याने थांबलेले असतात. थांबण्याबाबत कोणाचा आक्षेप नाही, परंतू अनेकदा या युवकांनी मद्यपान केलेले असते. अशातच ते गुटखा व मावा खावून सतत रस्त्यावर पिचकार्‍या मारत असतात. त्यामुळे या रस्त्यावरुन जाणार्‍या-येणार्‍यांना या गुटख्याचा दर्प सहनही होत नाही. तसेच मुख्यत्वे या रस्त्यावरुन महिलांची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरु असते. त्यामुळे अनेक महिलांनाही या रोडरोमिओंचा नाहक त्रास सहन करावा लागतो.

कुपर बंगल्यासमोर जाणारा हा मार्ग होमाई कुपर मार्ग म्हणून ओळखला जातो. तसेच हा रस्ता पालिकेने सायलेंट झोन म्हणजेच शांतता क्षेत्र म्हणून घोषित केलेले आहे. असे असताना याच रस्त्यावर मात्र सातारा शहरावरुन ओवाळून टाकलेल्या युवकांनी गेल्या काही महिन्यांपासून अक्षरश: उच्छाद मांडलेला आहे. तसेच याच परिसरामध्ये एकाने तर थेट अनाधिकृतपणे कार तसेच दुचाकींचे वॉशिंग सेंटरच थाटल्याने या सेंटरवरही मोठ्या प्रमाणावर डांबरट युवकांचा राबता असतो. बाजूलाच एका गाळ्यामध्ये चहा आणि नाष्ट्याचे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये येणारे भर रस्त्यावर सिगारेटचे झुरके मारुन सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान प्रतिबंधक कायद्याला फाट्यावर मारतात. बाजूलाच सिंम्बोयसिस आणि इतर छोटी-मोठी रुग्णालये आहेत. रस्त्यावर लावलेल्या दुचाकींमुळे अत्यवस्थ रुग्णांना रुग्णालयात घेवून येणार्‍या रुग्णवाहिकेला यामुळे अडथळा होत असतो. अनेकदा पोलिसांकडे तक्रारी करुनही पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे याठिकाणच्या रुग्णालयीन अस्थापनांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. युवकांच्या गोंगाटामुळे हॉस्पिटलमध्ये असणार्‍या अनेक रुग्णांनाही याचा त्रास होत असतो. त्यामुळे सिम्बोयसिस हॉस्पिटल ते राजमाता सुमित्राराजे उद्यान दरम्यान उभ्या राहणार्‍या टवाळखोरांवर कारवाई तसेच रोज सकाळ, दुपार व संध्याकाळी पोलीस गस्तीची मागणी होत आहे.

 

 दिव्यांगांना फुकणार्‍यांचा आधार?
येथील आरटीओ कार्यालयाच्या पिछाडीस असणार्‍या रस्त्यावर पालिकेने दिव्यांग बांधवांसाठी हॉकर्स झोन घोषित केलेला आहे. शहरातील अनेक दिव्यांगांना याठिकाणी तात्पुरत्या स्वरुपाची दुकाने उभी करण्यास पालिकेने परवानगी दिलेली आहे. मुळातच हा रस्ता अरुंद असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. तसेच रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला शासकीय वसाहत असल्याने याठिकाणी शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांच्या कुटूंबियांची वर्दळही असते. अशातच दिव्यांग बांधवांनी पालिकेने त्यांच्या उदरनिर्वाहासाठी देण्यात आलेली दुकाने अनेकांना चक्क भाडेतत्वावर दिलेली आहे. याच दुकानांमध्ये अनेकांनी चहा, गुटखा व इतर तत्सम गोष्टी विक्रीस ठेवलेल्या आहेत. याठिकाणी हजारो लोक चहा पिण्यासाठी व धुम्रपान करण्यासाठी येत असतात. येणारे ग्राहक आपली वाहने रस्त्यावरच इतरत्र लावत असल्याने हा रस्ता चौपाटीसदृश्य झालेला आहे. त्यातच एकेका गाळे लाभार्थीने दोन-दोन तीन गाळ्यांमध्ये आपले साम्राज्य पसरवले आहे. याचबरोबर अस्ताव्यस्त लावलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी झाल्यामुळे रोजच छोटे-मोठे अपघात होतात. तसेच बहुतांश या मार्गावरुन जिल्हा रुग्णालयाकडे जाणार्‍या रुग्णवाहिकाही जात असल्यामुळे त्यांच्या वाहतुकीसही अडथळा निर्माण होत असल्यामुळे रुग्णालयापर्यंत रुग्ण वेळेत पोहोचवणे, ही तारेवरची कसरत रुग्णवाहिका चालकाला करावी लागते. उदात्त हेतूने पालिकेकडून तयार करण्यात आलेला हा दिव्यांगांचा हॉकर्स झोन आता विडी, सिगारेटी आणि इतर मादक पदार्थ फुकणार्‍यांचा अड्डा झाल्याचे चित्र निदर्शनास येत असून याचा नाहक त्रास येथून ये-जा करणार्‍या पादचारी तसेच वाहनधारकांना होत आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सोमनाथ पवार यांचे जिल्हा परिषद आरोग्य विभागामध्ये आंदोलन
पुढील बातमी
जन्मदात्या बापानेच मुलाचा भिंतीवर आपटून, गळा दाबून केला खून

संबंधित बातम्या