राज्यात 1 कोटी 15 लाख क्विंटल साखरेची निर्मिती; 154 कारखान्यांकडून गाळप सुरू

by Team Satara Today | published on : 27 November 2025


सातारा : राज्यात गळीत हंगामाला सुरूवात झाली आहे. हंगाम होवून 26 दिवस होवून गेले आहे. हंगामाच्या प्रारंभी विधि कारणांमुळे बहुतांश कारखान्यांचा हंगाम अद्याप सुरू झालेला नाही. सध्याच्या घडीला 154 कारखान्यांकडून गाळप सुरू आहे. या सर्व कारखान्यांनी 1 कोटी 51 लाख 77 हजार टन उसाचे गाळप करून 1 कोटी 15 लाख 92 हजार क्विंटल साखरेची निर्मिती झाली आहे. तर राज्याचा उतारा अवघा 7.64 टक्के पडला आहे.

राज्यातील गळीत हंगामाला 1 नोव्हेंबरपासून सुरूवात झाली आहे. यंदाच्या हंगामासाठी केंद्र सरकारने 10.25 टक्के उताऱ्याला 3550 एफआरपी जाहीर केली आहे. साताऱ्यातही उस दर जाहीर करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारले. यानंतर बहुतांश कारखान्यांनी एकरकमी 3500 रूपये देण्याचे मान्य केले. मात्र, हंगाम सुरू होवून 26 दिवस झाले तरी अद्याप पूर्ण क्षमतेने गाळप होत नसल्याचे चित्र आहे. राज्यात गतवर्षी सुमारे 200 कारखान्यांनी गाळप केले होते. मात्र, यंदा हा आकडा 154 वर आला आहे.

राज्यात कोल्हापूर विभागात सहकारी 21 व खासगी 10 असे एकूण 31, पुणे विभागात सहकारी 16 व खासगी 9 असे एकूण 25, सोलापूर विभागात सहकरी 12 व खासगी 23 असे एकूण 35, अहिल्यानगर विभागात 13 सहकारी व 9 खासगी असे 22, छत्रपती संभाजीनगर विभागात 9 सहकारी व 6 खासगी असे एकूण 15, नांदेड विभागात सहकारी 9, खासगी 15 असे एकूण 24 तर अमरावती विभागात केवळ 2 कारखाने सुरू आहेत.

यामध्ये कोल्हापूर विभागाने 37 लाख 63 हजार टन गाळप करून 33 लाख 33 हजार क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. पुणे विभागाने 36 लाख 32 हजार टन गाळप करून 29 लाख 66 हजार क्विंटल साखर तयार केली आहे. सोलापूर विभागाने 35 लाख 9 हजार टन गाळप करून 24 लाख 18 हजार क्विंटल साखर बनवली आहे. अहिल्यानगर विभागात 18 लाख 13 हजार टन उसाचे गाळप करून 12 लाख 97 हजार क्विंटल साखर बनवण्यात आली आहे. छ. संभाजीनर विभागात 12 लाख 8 हजार टन उसाचे गाळप होवून 7 लाख 62 हजार क्विंटल साखर तयार झाली आहे. नांदेड विभागात 10 लाख 85 हजार टन उसाचे गाळप होवून 7 लाख 32 हजार क्विंटल साखर निर्मिती झाली आहे. अमरावती विभागात 1 लाख 7 हजार टन गाळप करून 84 हजार क्विंटल साखर निर्मिती झाली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
उदयनराजे अन् शिवेंद्रराजेंना नाराजांची 'टशन' : सातारा पालिकेची सत्ता 'बंडखोरांवर' अवलंबून राहण्‍याची चिन्‍हे
पुढील बातमी
संविधानातील मूल्ये जपणे गरजेचे- डॉ. प्रकाश कांबळे, कला व वाणिज्य महाविद्यालयात संविधान दिवस उत्साहात

संबंधित बातम्या