सातारा–लोणंद राष्ट्रीय महामार्गावरील वाढे येथे ब्रिटिश कालीन पुलाची दुरावस्था

पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने पुलाला धोका; जीव धोक्यात घालून प्रवास

by Team Satara Today | published on : 15 September 2025


सातारा,  दि.  १५  : सातारा–लोणंद राष्ट्रीय महामार्गावरील वाढे गावाजवळील ब्रिटिशकालीन पूल आज अतिशय जीर्णावस्थेत पोहोचला आहे. एकेकाळी भक्कम व मजबूत असलेला हा पूल आज झाडाझुडपांनी वेढलेला असून, पावसाचे पाणी साचल्यामुळे आणि देखभालीअभावी धोकादायक ठरत आहे. या पुलावरून सातारा–पुणे मार्गावरील जड वाहनांची वाहतूक सुरू असून स्थानिक ग्रामस्थांना रोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. दुर्दैवाने, येथे काही नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत.

“हजारो वाहने रोज या पुलावरून जातात, पण प्रशासन मौन बाळगून आहे. ”या पुलावर पावसाचे पाणी निचरा व्हावा म्हणून जागा ठेवलेली होती. मात्र, रस्त्यावर वारंवार करण्यात आलेल्या अतिरिक्त भरावामुळे या जागा पूर्णपणे बंद झाल्या आहेत. परिणामी, पावसाचे पाणी पुलावर साचून मोठे खड्डे निर्माण झाले असून वाहनधारक आणि पादचारी यांना मोठा धोका निर्माण झाला आहे.नागरिक रोज जीव धोक्यात घालून प्रवास करतात, ही शासनाची मोठी जबाबदारी आहे.या आधीही विविध संघटनांनी आंदोलन केलेले व प्रशासनाकडे निवेदन दिलेले असूनही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही. जर शासनाने वेळेत लक्ष घातले असते तर पूल सुस्थितीत राहिला असता आणि जीवितहानी टळली असती.

ग्रामस्थांची ठाम मागणी : पुल व रस्त्याची तातडीने दुरुस्ती व्हावी.रस्त्यावरील उंच भराव कमी करून ड्रेनेज लाईन खोल करून पुलाच्या बाजूने सोडावे.पुलावर सिमेंट काँक्रीट रस्ता करून पाण्याचा जुनी ड्रेनेज होल मोकळे करून निचरा व्यवस्थित व्हावा. दोन्ही बाजूंनी रस्त्याची उंची संतुलित करावी. अतिरिक्त भरावा काढून. “जर शासन व प्रशासनाने वेळेत कार्यवाही केली नाही, तर ग्रामस्थांना लोकवर्गणी व श्रमदानातून रस्ता व पूल दुरुस्ती करण्यास परवानगी द्यावी; अन्यथा उद्भवणाऱ्या गंभीर परिणामांची जबाबदारी शासनावर राहील.”


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
इन्फ्लुएन्सर्संनी कल्पतेमधून सोशल मीडियावर शासकीय योजनांचा प्रसार करावा
पुढील बातमी
कराडात व्यावसायिक गरबा, दांडियाला विरोध; सकल हिंदू समाज आक्रमक

संबंधित बातम्या