सातारा : गुगल कंपनीचे सर्वेसर्वा इलॉन मस्कची टेस्ला कंपनी सातारा जिल्ह्यात आपल्या युनिटसाठी जमीन शोधत असल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी इलेक्ट्रिक वाहनांसाठी (इव्ही) पूर्णपणे वेगळे असे असेम्ब्ली युनिट कंपनीकडून उभारण्यात येणार आहे. त्यामुळे जर याला मूर्त स्वरूप आले, तर साताऱ्याच्या औद्योगिक क्षेत्राच्या विकासामधील आतापर्यंतची ही सर्वात मोठी घडामोड ठरणार आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, टेस्ला कंपनीला भारतातील वाहन उद्योगामध्ये प्रवेश करायचा आहे. त्यासाठी सुरुवातीला हैदराबाद येथील मेघा इंजिनिअरिंग कंपनीसोबत वाटाघाटी सुरू होत्या. त्या योग्य पद्धतीने झाल्या नाहीत. त्यामुळे टेस्ला कंपनीने दुसऱ्या गुंतवणूकदारासोबत संयुक्त उपक्रमासाठी चर्चा सुरू केली आहे. त्या अनुषंगाने साताऱ्यात जमीन घेऊन सीकेडी युनिट सुरू करण्याची योजना आहे.
वाहनांचे भाग निर्यात करून त्यांना भारतात स्थानिक पातळीवर एकत्र करणारे हे युनिट असणार आहे. त्यामुळे कंपनीचे आयात शुल्क कमी होते, तसेच स्थानिक रोजगारालाही चालना मिळू शकते. याबाबत औद्योगिक व आर्थिक क्षेत्रातील माध्यमांनीही हे वृत्त दिले आहे. या वर्षीच्या शेवटच्या तिमाहीमध्ये टेस्ला कंपनीचे भारतात आगमन होणे अपेक्षित आहे. तत्पूर्वी आपल्या वाहनांच्या विक्रीसाठी टेस्ला कंपनीने मुंबईमध्ये शोरूमसाठी एक जागा निश्चित केली आहे.
या ठिकाणाहून कंपनीने आयात केलेली वाहने विकली जाणार आहेत. टेस्लाच्या मुख्य व भारतातील कार्यालयांकडून याबाबत केंद्र व राज्य शासनाचा पत्रव्यवहारही झाला आहे. महाराष्ट्र सरकारने यापूर्वी पुणे जवळील चाकण व चिखली येथे जमीन देण्याची ऑफर टेस्ला कंपनीला दिली होती. चाकण हे भारतातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल हब्सपैकी एक आहे; परंतु कंपनीला साताऱ्यामध्ये जागा घेण्याची इच्छा आहे. त्यानुसार जिल्ह्यातील जमिनींची पाहणी कंपनीकडून सुरू असल्याचे सांगितले जात आहे. जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने ही एक महत्त्वाची घडामोड आहे. टेस्ला कंपनीने जमिनीची पाहणी करून कंपनी उभारण्याचे निश्चित केल्यास जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना, तसेच युवकांना रोजगार मिळण्यास मदत होणार आहे. दरम्यान, टेस्ला कंपनीने शिरवळ येथील जमिनीची चाचपणी सुरू केली असून, शिरवळ (खंडाळा) औद्योगिक टप्पा क्रमांक तीनमध्ये अंदाजे ७५० एकर जमीन पाहिली असल्याची चर्चा आहे; परंतु याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.
सातारा जिल्ह्यामध्ये टेस्ला कंपनी जमीन शोधत असल्याची अधिकृत माहिती अद्याप आमच्या कार्यालयाकडे आलेली नाही. कंपनीने उद्योग उभारणीसाठी जमिनीच्या आवश्यकतेबाबतही संपर्क केलेला नाही.
- अमितकुमार सोंडगे, प्रादेशिक अधिकारी (औद्योगिक विकास महामंडळ, सातारा)