आरोग्यमित्रांना किमान वेतन कायद्यानुसार पगार मिळाला पाहिजे : डॉ.डी.एल.कराड

सिटू संलग्न महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेची किमान वेतनाची मागणी

by Team Satara Today | published on : 02 January 2025


सातारा : महाराष्ट्र राज्य आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी.एल. कराड यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यमित्रांचे अधिवेशन नाशिक येथील सिटू भवन येथे डिसेंबर मध्ये पार पडले. या अधिवेशनात संपूर्ण राज्यामधून आलेल्या सर्व जिल्ह्यातील आरोग्य मित्रांनी सहभाग नोंदवला. या अधिवेशनासाठी सातारा जिल्ह्यातून सातारा जिल्हाध्यक्ष संदिप फणसे आणि राज्य कार्यकारिणी सदस्य युसूफ पट्टनकुडे यांनीही सातारा प्रतिनिधी म्हणून सहभाग नोंदवला.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ. कराड यांनी महाराष्ट्रातील आरोग्य मित्रांना मार्गदर्शन केले. यामध्ये राज्यातील विविध जिल्ह्यातील आरोग्यमित्रांची  पदाधिकारी म्हणून नेमणूक करून आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेची महाराष्ट्र राज्याच्या कमिटीची स्थापना करण्यात आली. या कमिटीने विविध ठरावांसह आरोग्य मित्रांना किमान वेतन कायदा लागू करावा अशी मागणी केली .

अधिवेशनामध्ये आरोग्यमित्राच्या समस्या डॉ. कराड यांनी जाणून घेतल्या. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतील सहाय्य संस्था (TPA कंपनी) ह्या आरोग्यमित्रांचे आर्थिक शोषण करीत आहेत. असे आरोग्यमित्रांनी निदर्शनात आणून दिले. लवकरात लवकर राज्य आरोग्य हमी सोसायटी, आरोग्य मंत्री, मुख्यमंत्री यांना पगारवाढीचे निवेदन देण्याची मागणी आरोग्य मित्रांकडून करण्यात आली. तसेच सर्व आरोग्य मित्रांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळावे, आरोग्य मित्रांना हक्काचा रजा मिळाव्यात, आरोग्य मित्रांची नोकरीची हमी राज्य आरोग्य हमी सोसायटीने घ्यावी अशी मागणी सर्व आरोग्यमित्रांच्या वतीने करण्यात आली.

यावर संघटनेचे अध्यक्ष डॉ. कराड म्हणाले की आपल्या मागण्या आपण सरकारपर्यंत पोहोचविणे खूप गरजेचे आहे. यासाठी आपण आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन यांना निवेदनाचे पत्र देणार आहे. जर मागण्या लवकरात लवकर मान्य न केल्यास राज्यभर काम बंद आंदोलन करणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी दिली.

आरोग्य मित्रांना किमान वेतन कायद्यानुसार पगार न दिल्यास राज्यभर काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला असून राज्य आरोग्य हमी सोसायटीने नेमलेल्या सहाय्य संस्थेने (TPA कंपनी) आरोग्यमित्रांना अकुशल कामगार म्हणून दाखवल्याची माहिती आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ट्रॅक्टरखाली सापडून शाळकरी मुलाचा मृत्यू
पुढील बातमी
डी. जी. कॉलेजमध्ये मध्ये स्टेट बँक भरतीचे मार्गदर्शन

संबंधित बातम्या