अनेकदा हिंदी कलाकार मराठी सिनेमांचं, मराठीतील कलाकारांचं कौतुक करतात. तसंच मराठी कलाकारांना हिंदी सिनेमात काम करताना शूटिंगवेळी सेटवर खूप आदर मिळतो. नुकताच मराठी फिल्मफेअर सोहळा पार पडला. यासाठी हिंदीतील तब्बू, राजकुमार राव, जयदीप अहलावत, नवाजुद्दीन सिद्दीकी ही मंडळीही उपस्थित होती. या सोहळ्यानंतर जयदीप अहलावत आणि नवाजुद्दीन सिद्दीकीने मराठी सिनेमांचं भरभरुन कौतुक केलं.
नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला, "मराठीत कायमच चांगले सिनेमे बनत आले आहेत. मी तर म्हणेन बॉलिवूडपेक्षाही जास्त चांगले सिनेमे आहेत. फँड्री, कोर्ट सारखे अनेक असे आयकॉनिक सिनेमे आहेत. मराठीतून नेहमी काही ना काही चांगलंच येतं. याचं कारणही काय तर सगळे थिएटर करून येतात. त्यांना नाटकात काम करण्याचा सराव असतो. मराठीत असे अनेक कलाकार आहेत जे खूप टॅलेंटेड आहेत मात्र त्यांना तितकं यश मिळत नाही. कलाकारांना घेऊन मग त्यांना स्टार बनवायचं, मोठ्या बजेटचे सिनेमे करायचे हेच चलन जर आपल्याकडे आलं तर नक्कीच इंडस्ट्रीत मोठा बदल घडेल."
जयदीप अहलावत म्हणाला, "मला मराठी सिनेमा खूप आवडतो. मी सुद्धा थिएटर केलं आहे. फिल्म इन्स्टिट्यूट पुणे येथे जेव्हा शिकत होतो तेव्हा मला जाणवलं की मराठी थिएटर किती स्ट्राँग आहे. मी चकितच झालो होतो. 'किल्ला' सिनेमा जो माझ्या मित्राने बनवला फारच सुंदर आहे. 'नटसम्राट' या सिनेमाचा तर मी अजूनही तितकाच मोठा चाहता आहे. कधीही पाहिला तरी मी प्रभावित होतो. पुढे काही वर्षांनी संधी मिळाली तर मला नटसम्राट हिंदीत करायला आवडेल."