साताऱ्यात उद्यापासून भव्य ‘हिरकणी महोत्सवा’चा जागर; महिला उद्योजकता आणि संस्कृतीचा अनोखा संगम

by Team Satara Today | published on : 09 April 2026


सातारा: सातारा शहराच्या सांस्कृतिक आणि सामाजिक वैभवात भर घालणाऱ्या भव्य राज्यस्तरीय ‘हिरकणी महोत्सव २०२६’ चे उद्यापासून जिल्हा परिषद मैदानावर दिमाखात आयोजन करण्यात आले आहे. शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्राला नवी दिशा देणारा हा महोत्सव महिलांच्या कलागुणांना आणि उद्योजकतेला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने साकारला जात असून, सातारकरांसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे.

​या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे १५० हून अधिक महिला बचत गट आणि महिला उद्योजिकांनी लावलेले विविध वस्तूंचे स्टॉल्स. महिलांच्या कौशल्यांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम मानला जात आहे. महोत्सवात येणाऱ्या नागरिकांना एकाच छताखाली मनपसंत शॉपिंग, खवय्यांसाठी लज्जतदार मेजवानी आणि मनोरंजनाचे विविध कार्यक्रम अनुभवायला मिळतील.

​महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. याप्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहून महोत्सवाची शोभा वाढवतील. सामाजिक क्षेत्रात सातत्याने सक्रिय असणाऱ्या सौ. जयश्री शेलार यांनी या महोत्सवाचे नेटके नियोजन केले आहे.

​पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवात वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची रेलचेल असेल. यामध्ये मुंबई कॉलेजतर्फे आयोजित फॅशन रनवे, ‘महाराष्ट्राची साम्राज्ञी’ हा विशेष फॅशन शो, आणि सातारा परिसरातील कलाकारांना संधी देणारा ‘फेसबुक सातारा कल्चरल शो’ यांचा समावेश आहे. तरुणाईसाठी इम्पॅक्ट डान्स फेस्टिव्हल, लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट आणि हिप-हॉप सातारचे सादरीकरण होणार आहे. तसेच महाराष्ट्राची लोकसंस्कृती जपण्यासाठी लावणीचा विशेष कार्यक्रम आयोजित केला असून, अनेक नामवंत सेलिब्रिटी देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत.

​विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून महोत्सवात करिअर मार्गदर्शनाचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत, तर लहान मुलांसाठी स्वतंत्र गेम झोनची व्यवस्था करण्यात आली आहे. आयपीएल क्रिकेटचे सामने मोठ्या पडद्यावर पाहण्याची सोय देखील या ठिकाणी उपलब्ध आहे. दि. १० एप्रिल ते १५ एप्रिल २०२६ या कालावधीत चालणाऱ्या या महोत्सवाचा लाभ सातारा व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन आयोजक सौ. जयश्री शेलार आणि हिरकणी महोत्सवाच्या टीमकडून करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी पुन्हा दरेगावच्या दौऱ्यावर; सत्तासमीकरणातील बदलामुळे राजकीय वर्तुळात विशेष महत्त्व
पुढील बातमी
साताऱ्यात जलमंदिर पॅलेस येथे मंत्री गिरीश महाजन-खासदार उदयनराजे भोसले भेट; राजकीय चर्चांना उधाण

संबंधित बातम्या