सातारा : देगाव फाटा येथील भंगार व्यावसायिक अभय स्टीलचे दुकान मालक रमेश गुरुप्रसाद गुजर (वय ५०, रा.सदरबझार) यांना खासगी सावकारी करून शिवीगाळ,दमदाटी केल्याप्रकरणी संजय बाळू सकाटे ( रा. गुरुवार पेठ) आणि रफिक अब्दुल रहिमान कच्छी (रा. शनिवार पेठ,सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
संजय बाळू सकाटे व रफिक अब्दुल रहिमान कच्छी यांनी २०१८ पासून २०२५ पर्यंत गुजर यांना ९ लाख रुपये व्याजाने पैसे दिले होते. त्या बदल्यात दर महिन्याला सात टक्के व्याजानी त्यांच्याकडून ३८ लाख २० हजार रुपये वसूल केले आहेत. दोघांनी गुजर यांना वेळोवेळी शिवीगाळ करून व्याजाचे पैसे दिले नाही तर जीवे मारून टाकण्याची धमकी देखील दिली होती. आतापर्यंत संशयित आरोपींनी ४० लाख व त्यावरील व्याज फिर्यादीकडे असल्याबाबत हिशोब दाखवून जबरदस्तीने फिर्यादीच्या मालकीची गुजरवाडी येथील ९४ लाख रुपये किमतीची १८९ गुंठे जमीन ८५ लाख रुपयांना त्यांना विकत असल्याबाबत नोटरी कागदपत्रे तयार करून जमिनीचा ताबा घेऊन जबरदस्तीने जमीन बळकावली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिसात अपहार ठकवणूक, सावकारी करून शिवीगाळ आणि दमदाटी केल्याप्रकरणी दोन जणांवर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस हवालदार माने करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.