सातारा : पदवीधर आणि शिक्षक मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरु झालेला आहे. 30 सप्टेंबरला अधिसुचना प्रसिद्ध करण्यात येणार असून मतदार नोंदणी प्रथम प्रसिद्धी दि. 15 ऑक्टोबर आणि द्वितीय प्रसिद्धी 25 ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे, तरी जास्तीत जास्त मतदारांनी आपली मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे ह उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले, मतदार नोंदणीची जाहीर सुचना दि. 30 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर दि. 15 ऑक्टोबर रोजी प्रथम पूर्नप्रसिद्धी, 25 ऑक्टोबर रोजी द्वितीय पूर्नप्रसिद्धी करण्यात येणार आहे. दि. 6 नोव्हेंबर पर्यंत प्रकरणपरत्वे नमूना 18 किंवा 19 द्वारे दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहे. दि. 20 नोव्हेंबर हस्तलिखीते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई, दि. 25 नोव्हेंबर प्रारुप मतदार यादी प्रसिद्धी करण्यात येणार आहे. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी दि. 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या दरम्यान आहे. दावे व हरकती निकाली काढण्याचा आणि पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे 25 डिसेंबरला आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा दि. 30 डिसेंबरला होणार आहे.
शिक्षक आणि पदवीधर मतदार नोंदणी करता सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी 8, पदनिर्देशित अधिकारी 46 आणि अतिरिक्त पदनिर्देशित अधिकारी 14 नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात सातारा जिह्यात यापुर्वी 44 मतदार केंद्रावर शिक्षक 7711 मतदार होते. तर पदवीधरसाठी 123 मतदान केंद्रावर 59071 मतदार संख्या होती. आता नव्याने मतदार नोंदणी केली जाणार आहे. पाठीमागची मतदार नोंदणी ग्राह्य धरली जाणार नाही. दरम्यान, मतदार नोंदणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर अर्ज दिला आहे. दिलेल्या नोंदणी केंद्रावर अर्ज स्वीकारले जाणार आहेत, असेही जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले.