कलेढोण : मायणी चांदणी चौकात गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी विना परवाना जनावरांची वाहतूक करणारा ट्रक व १६ जनावरे ताब्यात घेतली. याप्रकरणी वाहनचालकासह एकास वडूज पोलिसांनी ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल झाला आहे.
प्रवीण सानप व सहकाऱ्यांनी चांदणी चौक येथे रात्री विटा (जि. सांगली) बाजूकडून संशयितरीत्या भरधाव वेगाने कातरखटावच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकचा पाठलाग केला, त्यात एक लाख ८० हजारांची मुरा जातीची एक, पंढरपुरी जातीच्या दोन, डुगल जातीच्या दोन, साध्या जातीच्या नऊ म्हशी, दोन रेडके अशी १६ जनावरे व सहा लाख रुपये किमतीचा ट्रॅक असा एकूण सात लाख ८० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
यामध्ये वाहनचालक मायाप्पा बाळाप्पा चिकदम (वय ३१) व लक्ष्मण लगमना नाईक (वय २७, दोघेही रा. तालुका चिकोडी, जि. बेळगाव) यांना ताब्यात घेतले आहे. जनावरांना शिरोळ (जि. कोल्हापूर) येथील गोशाळेत पाठवण्यात आले आहे. हवालदार अजित काळेल यांनी फिर्याद दिली असून, हवालदार नानासाहेब कारंडे तपास करीत आहेत.