दहिवडी : फलटण - दहिवडी रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग एनएच - 160 अंतर्गत रस्त्याचे काम सुरू आहे. हा राष्ट्रीय महामार्ग करत असताना ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीतून रस्ता जातोय त्यांना विचारात न घेता कोणताही मोबदला न देता काम सुरु आहे. वारंवार हरकती, निवेदने,समक्ष भेटून प्रशासन,भूसंपादन व राष्ट्रीय महामार्ग विभाग शेतकऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहे.या विरोधात विविध मागण्या घेऊन माण-फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी आता रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला असून शुक्रवार, दि. 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता बिजवडी ता. माण येथे रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे.
निवदेनात म्हटले आहे की,या रस्त्यावर पूर्वी एसएच -10 अंतर्गत काम करताना शासनाने जमीन भूसंपादन करत असताना शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला दिलेला नाही. शासन ६६ फुटाचा मालकी हक्क टिपणीवरून सांगत आहे,त्यावेळी कोणत्याही शेतकऱ्यांना माहिती न देता व मोबदला न देता रस्ता करण्यात आला आहे.त्यास आमचा विरोध असून शासनाने जर जमीन भूसंपादन १९६७ साली केले असेल तर त्यांनी वारंवार मागणी करून पण रिवार्ड व निवाडे दिलेले नाहीत. जर १९६७ साली भूसंपादन केले आहे तर हा आम्हास रिवार्ड व निवाडे मिळावेत व जर आपण भूसंपादन केलेले आहे तर आपण कजाप का केले नाही.आमचे गट मोजले असता रोडची जमीन धरून आमचे गटाचे क्षेत्र सातबारा नुसार जुळत आहे. आणि रोडचे क्षेत्र सोडून सातबारा वरील क्षेत्र जुळत नाही तरी हे शासनाने आम्हास आमच्या जमिनीचा मोबदला द्यावा आणि जर जमिनी रोडसाठी भूसंपादन केले आहेत तर त्याचे रिवार्ड व निवाडे मिळावेत.तरी शासन शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे. बळजबरीने दडपशाहीने व चुकीच्या पद्धतीने महामार्गाचे काम चालू केले आहे त्यास आमचा सर्व शेतकऱ्यांचा विरोध आहे त्यामुळे आम्ही रस्त्यावर उतरत असून याची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणीही शेतकऱ्यांची केली आहे.