सातारा : सातारा नेव्हल वेटरन्स असोसिएशनच्या वतीने आयोजित सातवा वार्षिक नौसेना दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात, शिस्तबद्ध व भावनिक वातावरणात नुकताच साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम केवळ औपचारिक उत्सव न राहता, गेल्या सात वर्षांपासून निवृत्त नौसैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना एकत्र आणणारा आपुलकीचा सोहळा म्हणून ओळख निर्माण करत आहे.
या कार्यक्रमाला सातारा जिल्ह्यासह पुणे, सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने निवृत्त नौसैनिक, मान्यवर व कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी ८० वर्षांवरील ज्येष्ठ निवृत्त नौसैनिकांचा सन्मान करण्यात आला. सत्कारानंतर अनेक वयोवृद्ध मान्यवर भावुक झाले असून, असोसिएशनच्या निरपेक्ष कार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कमोडोर एस. पार्थिबन, कमांडिंग ऑफिसर, आय.एन.एस. शिवाजी (लोणावळा) हे पहिल्यांदाच साताऱ्यात आले होते. सैनिक स्कूल सातारा येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात अश्वारूढ स्वागत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी निवृत्त नौसैनिकांच्या पत्नींच्या बचत गटांनी उभारलेले विविध उत्पादनांचे स्टॉल्स हे विशेष आकर्षण ठरले. महिलांनी सादर केलेली उत्पादने, त्यांची मांडणी व आत्मविश्वासाने केलेले सादरीकरण पाहून प्रमुख पाहुण्यांनी विशेष प्रशंसा केली. या उत्पादनांना NWWA व CSD कॅन्टीनच्या माध्यमातून देशभर पोहोचवण्याचा विचार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
सांस्कृतिक कार्यक्रमात शास्त्रीय नृत्य, कविता, प्रश्नमंजुषा व गायनाने रंगत आणली. सर्व कार्यक्रम ठरलेल्या वेळेनुसार व अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले, हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी असोसिएशनचे मार्गदर्शक माजी उपनगराध्यक्ष श्री शंकरराव माळवदे, एडवोकेट वसंतराव नलावडे अध्यक्ष श्री सूर्यकांत पडवळ, अश्फाक पटेल, राजू निकम, संतोष भोसले, चंद्रकांत मोरे, अमित इनामदार, सुनील साळुंखे, उमेश साळुंखे, जीवन शिंगाडे, सौ. मीनाक्षी भोसले व इतर महिला व पुरुष सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. अनेक दानशूर मान्यवरांनी आर्थिक सहकार्य करून सामाजिक बांधिलकी जपली. कार्यक्रमानंतर उपस्थितांनी भोजनाचा आनंद घेत समाधान व्यक्त केले. अनेक मान्यवरांनी दूरध्वनीद्वारे असोसिएशनच्या कार्याचे मनापासून कौतुक केले. शिस्त, आपुलकी आणि निरपेक्ष सेवाभाव या त्रिसूत्रीवर आधारित हा सोहळा उपस्थित प्रत्येकाच्या मनावर ठसा उमटवणारा ठरला.