सहकार चळवळीच्या संवर्धनासाठी जिल्ह्यात विविध उपक्रम : जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक

by Team Satara Today | published on : 03 July 2025


सातारा : ‘सहकारी संस्था-चांगल्या जगाच्या सर्वसमावेशक व शाश्वत निर्मितीसाठी’ या घोषवाक्यासह शासनाने सन २०२५ आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष घोषित केले आहे. ६ जुलै केंद्र सरकारच्या सहकारीता मंत्रालयाचा ४ था स्थापना दिवस असून त्यानिमित्त दिनांक १ ते ६ जुलै २०२५ या कालावधीत सहकार चळवळीच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती सातारा सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक यांनी दिली.

या कार्यक्रमाअंतर्गत १ जुलै ते ६ जुलै २०२५ या कालावधीमध्ये जिल्ह्यातील विद्यार्थी, युवक, युवती, नागरीक, सहकारी संस्था त्यांचे सभासद, पदाधिकाऱ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत 1 जुलै रोजी लाडकी बहिण योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी नागरी सहकारी पतसंस्थेची नोंदणी करण्यासाठी मार्गदर्शन व चर्चासत्र घेण्यात आले. दि. 2 जुलै रोजी सहकार खात्याच्या अधिनस्त कार्यालये तसेच विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून वृक्ष लागवडीचे आयोजन करण्यात आले आहे.  3 जुलै रोजी सहकार खात्यांच्या अधिनस्त कार्यालयांमध्ये व विविध सहकारी संस्थांच्या कार्यालयांमध्ये स्वच्छता मे सहकार या उपक्रमांतर्गत कार्यालय परिसर स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे. 4 जुलै रोजी सातारा येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या किसनवीर सभागृहात आदर्श लेखापरिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. 5 जुलै रोजी सहकार चळवळीमध्ये युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी विद्यार्थी युवकांसाठी सहकारीता अभ्यास व प्रशिक्षणाबाबत जागृती चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 5 व  6 जुलै रोजी धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा यांच्या सभागृहात सहकारी संस्थांच्या उत्पादनांचे माहिती व विक्रीसाठी प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.  सातारा जिल्ह्यातील विद्यार्थी युवक, युवती नागरिक, सहकारी संस्था त्यांचे सभासद, पदाधिकारी यांनी आंतराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सुद्रिक यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात सकल हिंदू समाजाच्या जन आक्रोश मोर्चा
पुढील बातमी
घरातील नोकराने केली आई आणि मुलाची हत्या

संबंधित बातम्या