फलटण : विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर व रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर इन्कम टॅक्स विभागानं छापा टाकला आहे. फलटणसह पुणे व मुंबई येथील घरांवर व गोविंद डेअरी वर सुद्धा छापेमारी करण्यात आली असून सलग दुसऱ्या दिवशीही कारवाई सुरूच आहे.
संजीवराजे नाईक निंबाळकर हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी करण्यापूर्वीच आयकर विभागानं छापा टाकला गेला आहे. आयकर विभागाचे पथक संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर दाखल झाले आहे. आज सकाळी सहा वाजल्यापासूनच बंगल्यामध्ये इन्कमटॅक्स अधिकाऱ्यांकडून संजीवराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी सुरू करण्यात आली. बंगल्यामध्ये आत कोणालाही प्रवेश दिला गेला नाही.
संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमाणेच रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरीही केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी पडल्या आहेत. सकाळी सहा वाजता केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी छापा टाकण्यासाठी दाखल झालं आहे. या विषयीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
रघुनाथराजे नाईक निंबाळकर हे आधीपासूनच शरद पवार यांच्या पक्षात आहेत तर संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निवडणुकीआधी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशापूर्वी मोठी घडामोड झाली आहे.
संजीवराजे नाईक निंबाळकर हे येत्या काही दिवसांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. त्यापूर्वीच हा छापा टाकण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी साताऱ्यातील राज्यसभा खासदार नितीन पाटील यांच्याशी चर्चेनंतर प्रवेशाचा निर्णय होईल असं म्हटलं होतं.