गडचिरोलीत ११ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; नक्षलमुक्तीच्या दिशेने मोठे पाऊल

by Team Satara Today | published on : 19 March 2026


गडचिरोली : जिल्ह्यातील नक्षलवाद निर्मूलन मोहिमेला गुरुवारी महत्त्वाचे यश मिळाले असून तब्बल ६८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर असलेल्या ११ जहाल नक्षलवाद्यांनी पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलासमोर शस्त्रे खाली ठेवत आत्मसमर्पण केले. या घटनेमुळे जिल्ह्यातील नक्षलवादी चळवळीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये पाच वरिष्ठ पदावरील कमांडरांचा समावेश असून, यामध्ये विभागीय समिती सदस्य, क्षेत्रीय समिती सचिव तसेच पीपीसीएम आणि कमांडर दर्जाच्या नेत्यांचा सहभाग आहे. त्यामुळे संघटनेच्या नेतृत्व पातळीवरच मोठी पडझड झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, या सर्वांवर महाराष्ट्र शासनाने एकत्रित ६८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

पोलीस दलाकडून सातत्याने राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमा आणि शासनाच्या आत्मसमर्पण धोरणाला मिळालेला प्रतिसाद यामुळे नक्षलवाद्यांमध्ये मुख्य प्रवाहात परतण्याची प्रवृत्ती वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. हिंसेचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा निर्णय या नक्षलवाद्यांनी घेतल्याने प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे.

दरम्यान, गेल्या काही वर्षांत गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादाचे चित्र झपाट्याने बदलत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. २०२५ पासून आतापर्यंत १२३ सशस्त्र माओवाद्यांनी शरणागती पत्करली असून आजपर्यंत एकूण ७९४ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. एकेकाळी जिल्ह्याच्या सर्व उपविभागांमध्ये प्रभाव असलेला नक्षलवाद आता भामरागड उपविभागाच्या सीमावर्ती भागापुरता मर्यादित राहिल्याचे पोलीस प्रशासनाने नमूद केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोर्टातील तक्रार मागे घेण्यासाठी महिलेला शिवीगाळ आणि दमदाटी; एकावर गुन्हा दाखल
पुढील बातमी
सातारा तहसील कार्यालय परिसरात चेन स्नॅचिंग; ९० हजाराचे मंगळसूत्र लंपास

संबंधित बातम्या