पुसेगाव : खटाव तालुका माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी बलराम घोरपडे ( डिस्कळ ) व सचिवपदी महेश माने ( पुसेगाव) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पुसेगाव येथील श्री हनुमानगिरी हायस्कूल येथे तालुका कार्यकारिणी निवडीसाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माध्य.शाळा शिक्षकेतर महामंडळाचे राज्याध्यक्ष अनिल माने, जिल्हा सचिव इम्रान मुल्ला, जिल्हा उपाध्यक्ष संदीप शिंदे प्राचार्य डी एन गोफणे, जिल्हा संघटक विजय भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सन २०२५ ते २०२८ या कालावधीसाठी नूतन कार्यकारिणी ची बिनविरोध निवड झाल्याने संघटनेचे राज्य अध्यक्ष अनिल माने यांनी समाधान व्यक्त केले. निवडणूक निरीक्षक म्हणून संदीप शिंदे यांनी काम पाहिले. माने यांच्या हस्ते नूतन पदाधिकारी व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनिल माने म्हणाले, संघटनेच्या माध्यमातून शासनदरबारी शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रश्न सोडविले जात असून, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नविन पदभरतीसह न्याय मागण्यासाठी संघटनेची आग्रही भूमिका आहे. नूतन कार्यकारिणीने शाळांपर्यंत पोहचून बांधवांच्या अडचणी जाणून घ्याव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली . यावेळी बोलताना शिक्षकेतर संघटनेचे तालुकाध्यक्ष बलराम घोरपडे म्हणाले, संघटनेने दुसऱ्यांदा तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे, ही माझ्या कार्याची पोहच आहे. सर्वांना विश्वासात घेऊन शिक्षकेतर बांधवांच्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबध्द राहील असा विश्वास व्यक्त केला. पर्यवेक्षक मोहन गुरव यांनी सभेचे सूत्रसंचालन केले.