सातारा : ऊस दराच्या लढ्यानंतर शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना संपूर्ण ताकतीने मैदानात उतरली आहे. पण ज्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळवायचा आहे त्यांनी घरी बसून चालणार नाही, असे स्पष्ट मत स्वाभिमानीचे सातारा जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
नैसर्गिक आपत्ती बोगस खते व बियाणे यामध्ये वर्षोनुवर्षे शेतकरी भरडला जातोय हमीभावाची फक्त घोषणा होते. शेतमालाचे भाव जाणीवपूर्वक पाडून शेतकऱ्यांना लुटले जात आहे. सरकार आश्वासनापलिकडे जाऊन शेतकऱ्यांना कोणतीही मदत करत नाही तरीही शेतकऱ्यांनी लढण्याची गरज आहे. त्यासाठी आजपासून असहकार आंदोलनाला शेतकऱ्यांनी सुरुवात करायची आहे यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी सहभागी झाले पाहिजे यासाठी कोणतेही कर्ज भरायचेच नाही. जोपर्यंत सरकारने सत्तेवर येण्याअगोदर दिलेले आश्वासन पाळत नाही आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्तीची घोषणा करत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच ठेवायचे आहे.
सात बारा कोरा करण्याचे आश्वासन देऊन परत फक्त शेती कर्ज माफ करतो किंवा शेतकरी आंदोलन करत असेल जाब विचारत असेल तर त्याला अपशब्द वापरले ते आपण सर्वांनी पाहिले आहेत व ३१ जून ही तारीख कर्जमुक्तीसाठी निश्चित केली आहे. परंतु, ऊस बिलातून वसुली करायची कर्जमुक्तीसाठी नियमित कर्जफेड केली म्हणून अपात्र करायचे असे षडयंत्र सरकारचे चालू आहे हे स्पष्ट दिसत आहे.
त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कर्जच भरायचे नाही व कोणत्याही परिस्थितीत ऊस बिल किंवा अजून कोणत्याही मार्गाने वसूल करुन द्यायचे नाही त्यासाठी जो साखर कारखाना ऊस बिलातून कर्जाची कपात करणार नाही अशा साखर कारखाना यांना ऊस घालावे, तसेच विकास सेवा सोसायटी यांनी बेकायदेशीर वसुली ऊसबिलातून करु नये अन्यथा स्वाभिमानी यांना सुध्दा हिसका त्यांना दाखवला जाईल हे लक्षात ठेवावे.
शेतकऱ्यांचे ऊस बिल ज्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत सेव्हिंग खात्यात जमा केले जाते, त्याचा गोपीनीयतेचा भंग आजपर्यंत बँकेने केला व जबरदस्तीने शेतकऱ्यांचे खात्यातील येणारे पैसे कपात करुन सोसायटी यांना वर्ग केले आहेत. आता जर शेतकऱ्यांचे खात्यातील पैसे कपात केले तर बँकेचा परवाना रद्द करण्यासाठी नक्कीच आंदोलन करायला भाग पाडू नये.
कर्जमुक्त झाल्याशिवाय आता माघार नाही
शेतकरी गेली अनेक वर्षे सर्व कर्ज नवे जुने करुन कर्जबाजारी झाला आहे आणि बँकेच्या बेकायदेशीर वसूली मुळेच या अगोदरही कर्जमुक्तीपासून वंचित राहिला आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येईल कोणी बेकायदेशीर वसूली करेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते तसेच आमच्याशी संपर्क करावा परंतु कर्जमुक्त झाल्याशिवाय आता माघार नाही, असा इशारा शेळके यांनी दिला आहे .