शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात शांतता तर काँग्रेस बॅक फुटवर ! ; साताऱ्यात तिसऱ्या आघाडीचे काय झाले?; कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता

by Team Satara Today | published on : 10 November 2025



सातारा :  जिल्ह्यामध्ये पालिका व नगरपंचायत निवडणुकीसाठी घुमशान सुरू झाले असून भाजप, उद्धव ठाकरे शिवसेना गट, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्रिय झाला असताना शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात अद्यापही भयान शांतता असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच अस्वस्थता निर्माण झाल्याचे पाहायला मिळते. गेल्या काही दिवसांमध्ये सातारा पालिका निवडणुकीत आ. शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तिसरी आघाडी उतरेल अशी भाकिते व्यक्त केली जात होती. प्रत्यक्षात मात्र आज अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवसापर्यंत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गोटात कसलीही हालचाल दिसून आली नाही. दुसरीकडे जिल्ह्यामध्ये काँग्रेसची अवस्था कोमात गेल्यासारखी झाल्यामुळे सध्या तरी महायुती जोमात असल्याचे स्पष्ट होते. 

जिल्ह्यामध्ये सातारा, फलटण, कराड, वाई, महाबळेश्वर, पाचगणी, रहिमतपूर, म्हसवड, मलकापुर या ९ नगरपालिका तर मेढा नगरपंचायतीसाठी निवडणूक होणार आहे. या सर्व ठिकाणी नगराध्यक्ष व प्रभागांचे आरक्षण यापूर्वीच जाहीर झाले असून अंतिम मतदार याद्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. या निवडणुकांसाठी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, पालकमंत्री शंभूराज देसाई, बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खा. नितीन पाटील, आ. अतुल भोसले सक्रिय झाल्याचे पहायला मिळते. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी रविवारी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशाला स्वतः उपमुख्यमंत्री अजि‌त पवार यांनी उपस्थिती लावत सातारा जिल्ह्यातील राजकारणात 'मी आहेच' असे अधोरेखित केले. उदयनराजे भोसले, शिवेंद्रसिंहराजे भोसले आपापल्या आघाडीच्या माजी आणि इच्छुक नगरसेवकांची मते- मतांतरे जाणून घेत आहेत. शंभूराज देसाई ‌ यांनीही या निवडणुका गांभीर्याने घेतल्या आहेत.

ठिकठिकाणी बैठका, मेळावे घेत महायुतीमध्ये स्वाभिमान दुखावल्यास एकनाथ शिंदे शिवसेना स्वबळावर या निवडणुका लढेल, असा इशारा देत ते भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे. जावली तालुक्यातील मेढा नगरपंचायत निवडणुकीत शंभूराज देसाई यांनी विशेष लक्ष घातल्यानंतर सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही मेढा नगरपंचायतीची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. आम्ही कोणालाही कमी लेखत नाही.  निवडणुका आल्या म्हणून आम्ही जनतेसमोर येत नाही. पालकमंत्र्यांनी अगोदर पाटणमध्ये महायुतीचा निर्णय घ्यावा, जो निर्णय पाटणमध्ये होईल तोच निर्णय मेढ्यात असे स्पष्ट करत मेढा येथे भाजप कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही, असे स्पष्ट करत शंभूराज देसाई यांना

कोंडीत पकडण्याचा प्रयत्न शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला आहे. या नाट्यमय घडामोडीमुळे भाजपा आणि एकनाथ शिंदे शिवसेना गटात वाद  होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

खा. नितीन पाटील, ना. मकरंद पाटील यांच्यासाठी सुद्धा या निवडणुका प्रतिष्ठेच्या झाल्या आहेत. मकरंद पाटील यांच्या मतदारसंघातील महाबळेश्वर आणि पाचगणी या दोन पालिकांसाठी निवडणुका होत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे रहिमतपूर पालिकेचे निवडणूकही पाटील बंधूंसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. एकूणच भाजप, एकनाथ शिंदे शिवसेना गट आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या निवडणुकीसाठी सक्रिय झाला असल्याचे स्पष्ट होत असताना जिल्ह्यामध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र भयान शांतता दिसून येत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा आ. शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या एका बैठकीत जिल्ह्यातील ९ नगरपालिकांसह मेढा नगरपंचायतीची निवडणूक महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी एकत्रित लढवण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. सातारा येथील नगराध्यक्ष पदासह ५० जागांवर उमेदवार देण्याची घोषणाही या बैठकीत करण्यात आली होती प्रत्यक्षात मात्र सातारा पालिकेसाठी तिसऱ्या आघाडीची अद्याप काहीही हालचाल दिसून येत नाही. त्यामुळे कार्याकर्त्यांमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे. ‌‌ दुसरीकडे आ. शशिकांत शिंदे, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे उपनेते नितीन बानगुडे - पाटील यांचा सातारा शहराशी कधीही थेट संबंध आला नाही. त्यामुळे या निवडणुकीत सातारकर जनता महाविकास आघाडीला किती स्वीकारेल? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

काँग्रेस बॅक फुटवर 

गेल्या काही वर्षांमध्ये सातारा जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला म्हणावे असे यश मिळताना दिसत नाही. त्यातच  विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा झालेला पराभव कार्यकर्त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. एकेकाळी काँग्रेससाठी आधारस्तंभ ठरलेले तत्कालीन जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील, जयकुमार गोरे यांनी काँग्रेसची साथ सोडली. त्याच्यापाठोपाठ रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही काँग्रेसचा हात सोडला. त्यानंतर मात्र जिल्ह्यात काँग्रेसला खमके नेतृत्व मिळू शकले नाही. आ. अतुल भोसले यांनी कराडचे काँग्रेस नेते मनोहर शिंदे यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन जिल्ह्यात ऐन निवडणुकीच्या तोंडावर बेरजेचे राजकारण केले. त्यामुळे सध्या जिल्ह्यात काँग्रेस पूर्णपणे बॅक फुटवर गेल्याचे पहायला मिळत आहे.

आ. शशिकांत शिंदे यांना झुंजावे लागणार

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्ह्यात झालेल्या लाजिरवाणी पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला अद्यापही पक्षातील मरगळ झटकता आली नाही. त्याच्या उलट अजित पवार यांनी आपल्या पक्षाच्या माध्यमातून मकरंद पाटील यांची कॅबिनेट मंत्रीपदी तर नितीन पाटील यांची खासदार पदावर वर्णी लावून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला शह देण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेसमधुन एक एक शिलेदार बाहेर पडत असतानाच शरद पवार यांनी आ. शशिकांत शिंदे यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ घातली असली तरी जिल्ह्यात होणाऱ्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी आ. शशिकांत शिंदे यांना प्रचंड झुंजावे लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.



 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शिवथर येथे घरामध्ये एकाचा झोपेतच मृत्यू
पुढील बातमी
जिल्ह्यात भाजपाकडे स्टार प्रचारकांची 'मांदियाळी'; खा. उदयनराजे भोसले ठरणार हुकमी एक्का

संबंधित बातम्या