छत्रपती संभाजीनगर : जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचवणार्या 10व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आलेली आहे. बुधवार, 15 जानेवारी ते रविवार, 19 जानेवारी 2025 असे पाच दिवस हा कार्यक्रम होणार आहे. पीव्हीआर-आयनॉक्स थिएटर प्रोझोन मॉल, छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या मांदियाळीत संपन्न होणार आहे.
नाथ ग्रुप, एमजीएम विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण सेंटर व मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशन आयोजित अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने संपन्न होत असून प्रोझोन मॉल यांचे विशेष सहकार्य या फेस्टिव्हलला मिळालेले आहे. एनएफडीसी व महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ, महाराष्ट्र शासन यांची सहप्रस्तुती असणार आहे. डेलीहंट डिजीटल पार्टनर आहेत. सॉलीटेअर टॉवर्स हे या महोत्सवाचे सह आयोजक आहेत. एमजीएम स्कूल ऑफ फिल्म आर्टस या महोत्सवाचे अकॅडमीक पार्टनर तर एमजीएम रेडिओ एफएम 90.8 हे रेडिओ पार्टनर आहेत.
आजपर्यंतचे जागतिक दर्जाचे सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचावेत, चित्रपट दिग्दर्शक, तंत्रज्ञ, कलावंत व युवा पिढीतील सिनेमाची आवड असणार्या कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळून कला व तांत्रिक पातळीवर चित्रपटाचे रसग्रहण होत चित्रपट जाणिवा अधिक सशक्त व समृद्ध व्हाव्यात. मराठवाडा व छत्रपती संभाजीनगरचे नाव चित्रपटाच्या निर्मितीच्या अंगाने सांस्कृतिक केंद्र म्हणून व प्रोडक्शन हब म्हणून जागतिक पातळीवर पोहोचावे, छत्रपती संभाजीनगर शहरातील पर्यटन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यटकांपर्यंत पोहोचावे, मराठवाडा विभागातील गुणवंत कलावंतांना चित्रपट दिग्दर्शक, चित्रपट विषयातील तज्ज्ञ व तंत्रज्ञांपर्यंत पोहोचता यावे, त्यांच्यासोबत संवाद साधता यावा तसेच आताचा मराठी सिनेमा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचावा, हा या महोत्सव आयोजनामागे उद्देश आहे.
महोत्सवाच्या पाच दिवसांच्या कालावधीत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. महोत्सवात मागील वर्षाप्रमाणे भारतीय स्पर्धा गटाचा समावेश करण्यात आलेला आहे. यात विविध भारतीय भाषांमधील नऊ सिनेमांचा समावेश असून पाच राष्ट्रीय पातळीवरील परीक्षक हे प्रेक्षकांसह चित्रपट पाहणार आहेत. यातील सर्वोत्त्कृष्ट भारतीय चित्रपटाला सुवर्ण कैलास पारितोषिक व एक लक्ष रूपये देण्यात येणार आहे. तसेच सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट कलाकार (स्त्री/पुरुष) या वैयक्तिक पारितोषिकांचा देखील समावेश असणार आहे. भारतीय सिनेमा स्पर्धा गट ज्युरी समितीच्या अध्यक्षा ज्येष्ठ अभिनेत्री सीमा बिस्वास (गुवाहाटी) या असणार आहे. तर ज्युरी सदस्य म्हणून ज्येष्ठ छायाचित्रकार सी. के. मुरलीधरन (मुंबई), ज्येष्ठ संकलक दिपा भाटीया (मुंबई), ज्येष्ठ दिग्दर्शक जो बेबी (कोचीन) व ज्येष्ठ पटकथा लेखक व अभिनेते गिरीश जोशी (मुंबई) हे मान्यवर असणार आहेत.
या कार्यक्रमाचा समारोप सोहळा रविवार, 19 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 05 वाजता पीव्हीआर आयनॉक्स प्रोझोन मॉल येथे संपन्न होणार आहे. सुप्रसिध्द नृत्य व चित्रपट दिग्दर्शिका फराह खान, ऑस्कर विजेते साउंड डिझायनर रसूल पुक्कूट्टी व आयोजन समितीचे मानद अध्यक्ष प्रसिध्द दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप सोहळा संपन्न होईल. सुवर्ण कैलास पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव समारोपाची फिल्म म्हणून यंदाच्या ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीतील महत्वपूर्ण फिल्म ‘द सीड ऑफ सॅक्रेड फिग’ (पर्शियन) दाखविण्यात येणार आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
