वाई : वाई औद्योगिक वसाहतीतील सुलतानपुर येथील रहिवासी कॉलनी परिसरात गेल्या काही दिवसांपासून कचर्याचे ढिग वाढले असून त्यामुळे परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. दुर्गंधी आणि माशांच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
मुख्य रस्त्यालगतच उभारण्यात आलेल्या कचरा कुंडीत रोज मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. त्यात अन्न, वस्तू आणि इतर ओला कचरा टाकल्याने मोकाट जनावरे आणि श्वानांची वर्दळ वाढली आहे. या श्वानांकडून नागरिकांवर आणि विद्यार्थ्यांवर हल्ल्याच्या घटना घडत असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी या समस्येबाबत ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी दाखल केल्या असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. वाढत्या अस्वच्छतेमुळे परिसरात आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सुलतानपूर ग्रामपंचायत आणि वाई औद्योगिक विकास महामंडळाच्या वाई शाखेकडून तातडीने कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेसाठी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून हाेत आहे.