सातारा : सातारा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत किरकोळ वादावादीचे प्रसंग वगळता मतदान शांततेत पार पडले. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये बोगस मतदान आणि मतदान केंद्रात आलेल्या मतदारांना प्रलोभन दाखविण्याच्या कारणावरून वादावादीचे प्रसंग उद्भवले.त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.दिवसभरात 626 मतदारांची भविष्य मशीन बंद होऊन साधारण 63% मतदान झाल्याची माहिती निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली .
सातारा जिल्हा परिषदेच्या ६५ आणि पंचायत समितीच्या १३० गणांसाठी आज सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत मतदान झाले. जिल्ह्यातील ,२८७७ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबवली गेली. दुर्गम डोंगराळ चकदेव, कांदाटी खोरे, किल्ले प्रतापगड रायरेश्वर आदी भागातही मोठ्या उत्साहात मतदान प्रक्रिया राबविले गेली. मतदान प्रक्रिया सुरळीत राबविण्यासाठी कर्मचाऱ्यांनी मोठी शिकस्त केली. मतदान प्रक्रियेसाठी १३हजारावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
यावेळी भाजपा विरुद्ध दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस अशी चुरशीची लढत होत आहे. यामुळे सकाळपासून मतदारांमध्ये मोठा उत्साह होता.२१ लाख ९४ हजार ११० मतदारांपैकी दुपारी दीड वाजेपर्यंत आठ लाख सहा हजार ४६६ मतदारांनी(३६.७६टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत अकरा लाख १९ हजार ४६१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता (५१.०२ टक्के)मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
सकाळपासून मतदारांमध्ये मोठा उत्साह होता. आज लग्नाची मोठी तिथी असल्याने अनेक ठिकाणी लग्नसोहळे ही होते. लग्नाच्या गडबडीतही जावळी, फलटण आदी अनेक ठिकाणी नवरदेव आणि नवरी मुलीने लग्नाआधी मतदानाचे पवित्र कार्य पार पाडले. एका मतदान केंद्रावर हळदीच्या पोशाखात येऊन नवरदेवाने मतदानाचा हक्क बजावला. तर एका ठिकाणी लग्न विधी आटोपताच नववधू ने मतदानाचा हक्क बजावल्याचे दिसून आले.
सातारा तालुक्यातील खेडगटात समर्थकांमध्ये वादावादी झाली. पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.कराड तालुक्यात बोगस मतदानावरुन भाजप - राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्ते आमने सामने आले .कराड तालुक्यातही वडगाव हवेलीत तणावपुर्ण स्थिती पाहून पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली. मतदानासाठी महिलांमध्येही उत्साह होता. सकाळपासून मतदान केंद्रांवर महिलांच्या रांगा मोठ्या होत्या. वाई तालुक्यातील पसरणी, बावधन, भुईज येथे मोठी गर्दी होती.नव मतदारांनी ही मोठ्या उत्साहात मतदानाचा हक्क बजावला. मोठ्या संख्येने तरुण-तरुणी मतदानासाठी मतदान केंद्रावर हजर झाले होते.गोळेवाडी (ता कोरेगाव) येथे १०२वर्षे वय असलेल्याआजोबांनी व 98 वर्षी आजींनी मतदानाचा हक्क बजावला
फलटण येथे निवडणुकीच्या तोंडावर अघोरी बुवांच्या उपस्थितीने व त्यांच्या गाडीला थांबून चौकशी करण्यात आल्याने गोंधळ उडाला. त्यामुळे मतदानापूर्वीच एक दिवस आदी नाईक निंबाळकर गटांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणातील जिल्हाभर चर्चा झाली.सातारा कृष्णानगर मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण होऊन मोठी वादावादी झाली यामुळे तात्काळ घटना स्थळी पोलिस प्रशासन दाखल झाले त्यांनी परिस्थिती नियंत्रण आणली.
वडगाव हवेली (ता कराड)येथे भाजपा व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आले. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी वादावादी झाली.पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.
सातारा, कराड, वाई, फलटण, कोरेगाव, पाटण, खंडाळा, खटाव माण, जावळी, महाबळेश्वर या तालुक्यात सकाळपासून मोठ्या उत्साहात मतदान झाले. सर्वात जास्त मतदान महाबळेश्वर तालुक्यात झाले आहे. दुपारी साडेतीन पर्यंत या सर्व ठिकाणी ५०टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. एक किरकोळ वादावादीचे प्रसंग बघता सर्वत्र शांततेत मतदान झाले. मतदानासाठी जिल्हाभर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन व पोलीस अधीक्षक तुषार दोशी सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. दुपारी साडेतीन नंतर मतदान केंद्रांवर मोठ्या रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया थांबविण्यात आली होती त्यानंतर मतदान यंत्र बदलून ती तात्काळ सुरू करण्यात आली. एकूणच मतदान मोठ्या उत्साहात आणि शांततेत झाले.