पुणे : पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर परिसरात सातारा पोलिसांनी केलेल्या कारवाईत जबरी चोरी प्रकरणातील कुख्यात आरोपीचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. लखन भोसले असे मृत आरोपीचे नाव असून तो अनेक घरफोडी आणि गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलिसांच्या वॉन्टेड लिस्टमध्ये होता. या कारवाईत दुसरा एक आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार होण्यात यशस्वी झाला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिक्रापूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून घरफोड्यांच्या घटना वाढल्या होत्या. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांनी विशेष पथक तयार करून तपास सुरू केला. पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारे शिक्रापूरजवळ संशयित आरोपी लखन भोसले आणि त्याचा साथीदार या भागात असल्याची टीप मिळाली.
दोन दिवसापूर्वी महिलेच्या गळ्यातील चेन चोरी करून लखन भोसले फरार झाला होता. चाकूचा धाक दाखवून महिलेच्या गळ्यातील दागिने चोरी करतानाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. फरार झालेल्या लखन भोसले या आरोपीला शोधण्यासाठी सातारा पोलिसांचे पथक शिक्रापूर येथे गेले होते. लखन भोसलेला अटक करण्यासाठी गेलेल्या चार पोलिसांवर त्याने हल्ला केला. या हल्ल्यात चार पोलीस गंभीर जखमी झाले. आरोपी लखन भोसले हा खटाव तालुक्यातील जयराम स्वामी वडगाव येथील आहे.
खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी तातडीने तेथे सापळा रचला. दरम्यान, पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी शस्त्रासह पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आत्मसंरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात लखन भोसले जागीच ठार झाला. मात्र त्याचा दुसरा साथीदार घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला असून त्याच्या शोधासाठी पोलिसांनी मोठी शोधमोहीम हाती घेतली आहे.
लखन भोसले याच्यावर सातारा, सांगली, पुणे आणि इतर काही जिल्ह्यांत घरफोडी, दरोडे, चोरी, मारहाण अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. गुन्हेगारी जगतात त्याची दहशत होती. सातारा पोलिसांनी ही कारवाई केल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर शिक्रापूर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दुसरा आरोपी अद्याप फरार असून त्याला लवकरच गजाआड केले जाईल, असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
