सातारा : रहिमतपूर पोलीस ठाणे हद्दीतून गहाळ झालेल्या नागरिकांच्या मोबाईल फोनचा शोध घेण्यात रहिमतपूर पोलिसांना मोठे यश मिळाले असून एकूण २ लाख ९० हजार रुपये किमतीचे २० मोबाईल हस्तगत करून ते मूळ तक्रारदारांना परत करण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर व उपविभागीय पोलीस अधिकारी (सातारा ग्रामीण) राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जी. बी. केंद्रे, पोलीस हवालदार 102 बर्गे, पोलीस नाईक 1305 चव्हाण, 1531 देशमुख व महिला पोलीस नाईक 267 कांबळे यांनी सी.ई.आय.आर. पोर्टल व तांत्रिक माहितीच्या आधारे महाराष्ट्र तसेच परराज्यात मोबाईल मिळालेल्या व्यक्तींशी संपर्क साधून चिकाटीने तपास केला. अथक प्रयत्नांतून ही मोबाईल शोध मोहीम यशस्वी ठरली.हस्तगत करण्यात आलेले मोबाईल आज सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या हस्ते मूळ तक्रारदार नागरिकांना परत करण्यात आले.
ही मोबाईल शोध मोहीम भविष्यातही सातत्याने राबवली जाणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी दिली.ऑगस्ट २०२४ पासून आजपर्यंत रहिमतपूर पोलीस ठाण्याने एकूण १४ लाख ८५ हजार रुपये किमतीचे ७९ गहाळ मोबाईल शोधून नागरिकांना परत केले आहेत.