सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि महात्मा गांधी जयंती या कालावधीत राज्यात सेवा पंधरवडा राबवण्यात येत आहे. या अंतर्गत सातारा जिल्ह्यात पाणंद रस्ते खुले करण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. शेतकर्यांच्या हितासाठी जास्तीत जास्त पाणंद रस्ते खुले करण्यास लोकप्रतिनिधी सकारात्मक प्रतिसाद देतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
सेवा पंधरवड्याचा शुभारंभ पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात झाला. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मनोज घोरपडे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पालीस अधीक्षक तुषार दोशी, सहाय्यक उपवनसंरक्षक अमोल सातपुते, अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भरगुडे पाटील, प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच, स्वस्त धान्य दुकानदार, पोलीस पाटील व नागरिक उपस्थित होते.
पालकमंत्री देसाई म्हणाले, सेवा पंधरवड्यात जिल्हा प्रशासन अनेक चांगले उपक्रम राबवत आहे. ते अधिक व्यापक करण्यासाठी त्यामध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग घ्यावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या विभागांचे उपक्रम सुरू आहेत. राज्यातील साडेसात हजार युवक-युवतींना पर्यटनाशी संबंधित कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी पर्यटन विभागाकडून नमो पर्यटन कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. पर्यटन विकास महामंडळाच्या 35 जागा आणि अन्य काही जागा मिळून 75 ठिकाणी नमो बहुउद्देशीय पर्यटन सुविधा संकुले उभी करण्यात येणार आहेत. यात रायगड, प्रतापगड, शिवनेरी व मराठवाड्यातील साल्हेर या किल्ल्यांच्या पायथ्याशी सुविधा केंद्रे उभारण्यात येणार आहेत. सातारा जिल्ह्यातील अजिंक्यतारा, प्रतापगड या किल्ल्यांच्या संवर्धनासह विविध ठिकाणी एकात्मिक पर्यटन विकासाठी भरघोस निधी देण्यात येत आहे.
ना. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, सेवा पंधरवडा अभियान राज्यभर सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गेल्या दहा-बारा महिन्यांमध्ये लोकहिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. या निर्णयांनुसार आपल्या जिल्ह्यातील लोकांना लाभ दिले जात आहेत. जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना स्थानिक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व नागरिकांनी सकारात्मक साथ द्यावी. मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेटवर आधारित जो नवीन जीआर निघाला आहे, त्यानुसार पुरावे तपासून, पात्र असणार्यांना दाखले देण्याची सुरुवात मराठवाड्यात सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये झाली आहे. आपल्या जिल्ह्यातही विविध प्रकारचे दाखले देण्यात येत आहेत. घरकुल आवास योजनांना गती देण्यात येत आहे. सातारा शहरातील वैदू आणि कोल्हाटी वस्तीच्या घरांबाबत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी लक्ष घालावे.
जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले, सेवा पंधरवड्यात जिल्ह्यामध्ये 17 तारखेपासून फील्डवर कामकाज सुरू आहे. राज्यात प्रथमच पाणंद रस्त्यांना ओळख देण्याचा कार्यक्रम सुरू होत आहे. शेतात जाणार्या रस्त्यांना ओळख क्रमांक देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. प्रत्येक गावात स्वस्त धान्य दुकानांच्या सेवा क्यूआर कोडच्या माध्यमातून नागरिकांशी जोडल्या जात आहेत. या दुकानांच्या सेवांबद्दल अभिप्राय नोंदवण्यासाठी किंवा तक्रार करण्यासाठी नागरिकांना जिल्हाधिकारी किंवा तहसील कार्यालयांमध्ये जाण्याची गरज नाही. हे अभिप्राय क्यूआर कोडच्या माध्यमातून घरबसल्या नोंदवता येणार आहे. जिल्ह्यातील शेतकर्यांनी अॅग्रीस्टॅकमध्ये नोंदणी करावी.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते विविध दाखल्यांचे वाटप आणि रास्तभाव दुकान व सेवा केंद्रांचे मूल्यांकन करणार्या क्यूआर कोडचे लोकार्पण करण्यात आले. महसूल प्रशासनाच्या कामकाजावर शाहीर राजेंद्र भोसले यांनी पोवाडा सादर केला. पाणंद रस्त्यांच्या कामांची चित्रफितही दाखवण्यात आली.